Join us

गोरेगाव पत्राचाळ : आता नवे घर लवकर मिळावे एवढीच इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:06 AM

मुंबई : म्हाडाच्या असंवेदनशील धोरणामुळे तब्बल १२ वर्षांपासून गोरेगाव येथील पत्राचाळीतील ६७२ रहिवासी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत हक्काच्या घरांपासून ...

मुंबई : म्हाडाच्या असंवेदनशील धोरणामुळे तब्बल १२ वर्षांपासून गोरेगाव येथील पत्राचाळीतील ६७२ रहिवासी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत हक्काच्या घरांपासून वंचित होते. मात्र, आता त्यांना घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण गोरेगावमधील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) येथील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करून हजारो कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यावर येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे आणि आता कुठे आमच्या लढ्याला यश येत आहे, अशी समाधानकारक प्रतिक्रिया दिली आहे. आता ६७२ लोकांना घरे मिळतील, पण भाडे कधी व किती मिळणार आणि केव्हापासूनचे भाडे दिले जाणार, हा प्रश्न आहे. त्यासाठी आता प्रयत्न केला जाणार असून, आता नवे घर लवकर मिळावे एवढीच इच्छा रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळीतील रहिवाशांच्या संकुलाचे काम ठप्प पडले आणि गेल्या ५ वर्षांपासून रहिवाशांना घराचे भाडेदेखील मिळाले नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी रहिवाशांची अवस्था झाली. कोरोनामुळे तर पत्राचाळी रहिवासी आणखी आर्थिक अडचणीत आले. घरात किराणा भरण्यापासून राहत्या घराचे भाडे भरण्यापर्यंतच्या अनेक आर्थिक संकटांचा सामना रहिवाशांना करावा लागला. येथील पुनर्विकास प्रकल्प रखडल्याने एका दशकात बहुतांशी कुटुंबीयांनी घरांच्या प्रतीक्षेत अखेर मुंबई सोडली. काही रहिवाशांचे निधन झाले. अनेक कुटुंबांच्या नशिबी हलाखीचे जगणे आले. रहिवाशांचे भाडेविना व घराच्या प्रतीक्षेत एक तप निघून गेले. काही रहिवासी रोगांचे बळी झाले. आर्थिक समस्यांनी घराघरांत क्लेष वाढले. जगणे असह्य झाले. रहिवाशांना गोरेगाव सोडून विरार, वसईच्या पुढे जावे लागले. मात्र, आता दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याने रहिवाशांनी दिलासा व्यक्त केला आहे.

-------------------

कामाला प्रारंभ केला तर लवकर घर

आता लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण व्हावा हीच आमची इच्छा आहे. घरे लवकर मिळावी. घराचे भाडे लवकर मिळावे. घराचा ताबा लवकर मिळावा. त्रिपक्षीय कराराप्रमाणे जे काही ठरले आहे ते मिळावे. कारण येथील लोकांचे मोठे हाल झाले आहेत. कोरोनामुळे लोकांचा रोजगार बंद झाला. भाडे मिळाले नाही म्हणून राहत्या घराचे भाडे देण्यासाठी कर्ज काढावे लागले. अनेक अडचणी आल्या. भयानक परिस्थिती आहे. अशावेळी म्हाडाने भाड्याचा पहिला टप्पा सुरू केला तर दिलासा मिळेल. पहिल्या टप्प्यात सगळे मिळेल, असे नाही. मात्र, कामाला प्रारंभ केला तर लवकर घर मिळेल, अशी प्रतिक्रिया गोरेगाव सिद्धार्थनगर को.ऑप. हाऊसिंग सोसायटीकडून देण्यात आली.

-------------------

तेव्हा कुठे हे यश आले

गोरेगाव सिद्धार्थनगर, पत्राचाळ पुनर्वसन संघर्ष समितीने अन्यायाविरोधात आवाज उठविला. वांद्रे येथील म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढला. येथील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्विकास प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे आपल्या हक्काची जागा सोडून मुंबईबाहेर राहात आहेत, असे लक्षात आणून दिले. हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांनी अनिश्चितच काळासाठी उपोषणाचे हत्यार उपसले. एवढी आंदोलने झाली. तेव्हा कुठे हे यश आहे, असे समितीने सांगितले.

-------------------

आता घरे मिळतील; पण...

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. सरकारने जॉनी जोसेफ समिती नेमली. त्यातून मार्ग मोकळा झाला. आता ६७२ लोकांना घरे मिळतील, पण भाडे कधी व किती मिळणार आणि केव्हापासूनचे भाडे दिले जाणार, हा प्रश्न आहे. त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

-------------------

३ विकासकांबरोबर समझोता करार

म्हाडाने प्रस्तावित केल्याप्रमाणे प्रकल्पामध्ये विक्री इमारतींचे बांधकाम जवळपास पूर्ण केलेल्या ३ विकासकांबरोबर म्हाडा समझोता करार करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला आहे. पुनर्विकास प्रकल्पामधील मूळ रहिवाशांचे पुनर्वसन करणे, मूळ रहिवाशांचे थकीत भाडे देणे, म्हाडा हिश्श्यातील बांधकामाच्या सोडतीमधील ३०६ विजेत्यांना सदनिकांचे वितरण करणे; या मुद्यांच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी सेवानिवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पत्राचाळ येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत हा निर्णय घेतला गेला आहे.

-------------------

समिती काय करणार

म्हाडाच्या स्तरावर तज्ज्ञ तांत्रिक समिती स्थापन केली जाईल. समितीमध्ये म्हाडाचे तीन प्रतिनिधी व २ तज्ज्ञ यांचा समावेश असेल. प्रकल्पामध्ये म्हाडाला उत्पन्न होणारा महसूल, बांधकाम खर्च याची परिगणना समिती करेल.

-------------------

- म्हाडा या प्रकल्पाचा स्वत: विकास करेल

- हे करताना पत्राचाळ येथील मूळ ६७२ गाळेधारकांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून त्यांना गाळ्यांचा ताबा देण्यात येईल.

- म्हाडाच्या हिश्श्यातील सोडत काढलेल्या ३०६ सदनिकांच्या इमारतींची कामे पूर्ण करून संबंधितांना सदनिकांचा रितसर ताबा देण्यात येईल.

- संपूर्ण पुनर्विकास प्रकल्पाचे काम म्हाडातर्फे पूर्ण करावयाचे आहे.