गोरेगाव येथे शवविच्छेदन केंद्र अखेर सुरू
By admin | Published: March 2, 2016 02:28 AM2016-03-02T02:28:53+5:302016-03-02T02:28:53+5:30
गेली तीन वर्षे शासनाच्या आरोग्य आणि गृहखात्याच्या लालफितीत अडकलेले गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमधील शवविछेदन केंद्र अखेर सुरू झाले आहे
मनोहर कुंभेजकर , मुंबई
गेली तीन वर्षे शासनाच्या आरोग्य आणि गृहखात्याच्या लालफितीत अडकलेले गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमधील शवविछेदन केंद्र अखेर सुरू झाले आहे. निधन झाल्यानंतर मृतदेह ठेवण्याची सोयही इथे होणार आहे. त्यामुळे गोरेगाव, जोगेश्वरी आणि मालाड येथील रहिवाशांपुढे काही वेळा निर्माण होणारा प्रश्न सुटणार आहे.
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास परदेशातून येणाऱ्या नातेवाईकांना लागणारा वेळ लक्षात घेता, मृतदेह ठेवण्यासाठी हे शवविच्छेदन केंद्र सोयीचे ठरणार आहे. येथे आधुनिक यंत्रणेसह १८ मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे कूपर, शताब्दी आणि भगवती रुग्णालयावरील शवविच्छेदनाचा भार कमी होणार आहे.
पी (दक्षिण) विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा व पालिकेच्या आरोग्य समितीच्या सदस्या प्रमिला शिंदे यांनी या शवविच्छेदन केंद्राचा पालिकेकडील ताबा राज्य सरकाराच्या गृहखात्याकडे दिला. या वेळी पोलीस शल्यचिकित्सक डॉ. एस. एम. पाटील, सिद्धार्थ रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिमा पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय शिरवडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. भाले पाटील, डॉ. रणपिसे, डॉ. वाघमारे, डॉ. नीतू त्रिपाठी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पालिका प्रशासनाने येथे यंत्रसामग्री, संरक्षक भिंत, तसेच इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. गेल्या ११ जानेवारीला उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत येथील सिटी स्कॅन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या केंद्रासंदर्भात सुतोवाच केले होते.