- मनोहर कुंभेजकर
मुंबई : पश्चिम उपनगरात विलेपार्ले, अंधेरी पाठोपाठ गोरेगाव हे गजबजले स्थानक आहे. 29 मार्च 2018 साली पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे च्या हार्बर गाड्या गोरेगावपर्यंत विस्तारित करण्यात आल्याने आता गोरेगावची नवी ओळख झाली आहे.
गोरेगाव रेल्वे स्थानकावरून उतरल्यावर पूर्वेला असलेल्या रिक्षा,येथील नागरी निवारा,दिंडोशी,गोकुळ धाम,आरे कॉलनी,संतोष नगर,फिल्मसिटी येथे जाणारे विविध बेस्ट मार्ग तसेच इन्फिनिटी आय टी पार्क,विरवानी व प्रवासी औद्योगिक वसाहती येथे रोज नोकरी निमित्त येणारे कर्मचारी यामुळे स्टेशन बाहेरच्या अरुंद रस्त्यातून वाट काढणारी वाहने यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी असते.मात्र गुरांचा बाजार ते गोरेगाव सब वे या मार्गावरील प्रस्तावित 18.30 मीटर रुंद व 240 मीटर लांब डीपी रस्त्यामुळे येथील वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात कमी होऊन रोज हजारो प्रवाश्यांना आणि विशेषकरून गोरेगाव,जोगेश्वरी व दिंडोशी विधानसभेतील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा ठाम विश्वास पालिकेच्या प्रभाग क्रमांक 54 च्या शिवसेना नगरसेविका व महिला विभागसंघटक साधना माने यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.
उपनगराचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी शासनाच्या ताब्यातील मात्र गुरांचा बाजार ते गोरेगाव सब वे या मार्गावरील प्रस्तावित 18.30 मीटर रुंद व 240 मीटर लांब डीपी रस्त्याची जागा नुकतीच पालिकेच्या पी दक्षिण वॉर्डच्या नावे गेल्या 13 जून रोजी हस्तांतरित केली.त्यामुळे येत्या जुलै पर्यत सदर मार्गावर डांबरी रस्ता पूर्ण होईल.आणि येथून वाहतूक सुरू होईल असा विश्वास नगरसेविका साधना माने यांनी व्यक्त केला.
या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी नुकतीच येथे भेट दिली.या रस्त्याच्या आड येणारी चार ते पाच बांधकामे तोडण्यात येतील,आणि सदर डांबरी रस्ता येथे जुलै अखेर वाहतुकीस खुला करण्याचे या आढावा भेटीत ठरले.यावेळी रस्ते अभियंता आहुजा,पी दक्षिण विभागाचे दुय्यम अभियंता( मेंटेनन्स)सचिन भुरके,साहाय्यक अभियंता(मेंटेनन्स) अमित पाटील,उपविभागप्रमुख सुधाकर सुर्वे,शाखाप्रमुख अजित भोगले,रवी वर्मा व अश्विन माने आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांचा यामध्ये सिहाचा वाटा असून त्यांनी याप्रकरणी उपनगर जिल्हाधिकारी यांच्या बरोबर अनेक वेळा बैठका घेतल्या.याकामी शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर,आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी मोलाचे सहकार्य केले. आणि स्थानिक नगरसेविका म्हणून फेब्रुवारी 2017 मध्ये निवडून आल्यानंतर आपण येथे डीपी रस्ता होण्यासाठी पाठपुरावा केला होता अशी माहिती साधना माने यांनी शेवटी दिली.
गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी सांगितले की,९ नोव्हेंबर २०१२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने कॅटल मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचा दावा फेटाळून लावल्यावर डीपी रोडची जागा मनपाकडे हस्तांतरित करायची प्रक्रिया पार पडली असती,परंतू सदर काम पूर्ण होण्यास २०१९ जून उजाडला .
गोरेगाव प्रवासी संघाने माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना वारंवार भेटून हा विषय लावून धरला . खडसे यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन गुरांच्या बाजाराची जागा मोकळी करून बेस्टला हस्तांतरित करायचे आदेश दिले.त्यानंतर महिला व बालकल्याण राज्यमंत्री व गोरेगावच्या स्थानिक आमदार विद्या ठाकूर यांनीं बेस्ट डेपोचे काम पूर्ण व्हावे म्हणून पुढाकार घेतला .या विषयाबाबत गोरेगाव प्रवासी संघाचे कार्यकर्ते महसूल मंत्री
,चंद्रकांत दादा पाटील, जिल्हाधिकारी मुंबई उपनगरे , बेस्ट महाव्यवस्थापक, बृह्नमुंबई महानगर पालिका आयुक्त यांचेशी सातत्याने संपर्कात होते व बस डेपोचे व डीपी रोडचे काम मार्गी लागावे म्हणून पाठपुरावा करत होते.त्यामुळे सर्वांच्या प्रयत्नांचे फलीत म्हणून येथे लवकरच डीपी रस्ता होऊन येथील वाहतूक कोंडी कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.