गोरेगाव चेकनाका जवळील सर्वोदयनगर येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामातील प्रकल्पबाधितांना सामावून घेणार
By मनोहर कुंभेजकर | Published: October 20, 2023 06:56 PM2023-10-20T18:56:40+5:302023-10-20T18:57:56+5:30
सर्वोदय नगर येथील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन जवळच करण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली.
मुंबई: गोरेगाव चेकनाक्या जवळील सर्वोदयनगर येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये बाधित होणार्या सर्व प्रकल्पबाधितांना सामावून घेणार असल्याचे आश्वासन देत येथील येथील घरमालकांनी कुठल्याही अमिषाला तसेच जबरदस्तीला बळी न पडता आपले घर विकु नका? असे आवाहन जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी पी दक्षिण मनपा कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत केले. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणार्या गोरेगाव (पूर्व) येथील शाखा क्रमांक ५२ व ५३ मधील प्रलंबित विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी स्थानिक आमदार वायकर यांनी शुक्रवारी मनपाच्या पी दक्षिण विभागीय कार्यालयात बैठक घेतली होती.
या बैठकीला पी दक्षिणचे सहाय्यक आयुक्त राजेश आक्रे, मनपाच्या संबंधित विभागाचे अधिकारी, एसआरए व आरेचे अधिकारी तसेच शिवसेनेच्या माजी नगरसेविका रेखा रामवंशी, उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेंकर, बावा साळवी, महिला विभाग संघटक शालिनी सावंत, विधानसभा समन्वयक सुगंधा शेट्ये, शाखाप्रमुख बाळा तावडे, संदिप गाढवे, शाखा संघटक हर्षदा गावडे, अपर्णा परळकर, उमेश कदम आदी पदाधिकारी व रहिवाशी उपस्थित होते.
यावेळी सर्वोदय नगर येथील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन जवळच करण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली. त्यानुसार गोरेगावात कुठे कुठे पीएपी उपलब्ध आहे याची माहिती घेऊन प्रकल्पबाधितांचे जवळच पुनर्वसन करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे आमदार वायकर यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे रॉयलपाम येथील ज्या इमारतींना ताबा प्रमाणपत्र मिळाले आहे त्या सर्व इमारतींमधील रहिवाशाना मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार मंजुर पाणी देण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
आरेतील युनिट क्रमांक ३० फ्लिमसिटी गेट नंबर १ समोर सुधारीत आराखड्यानुसार बांधण्यात येणार्या पाण्याच्या टाकीसाठी शॉट टेंडर काढण्यात यावे व १५ दिवसांमध्ये कामाला सुरूवात करण्यात यावी, अशा सुचनाही वायकर यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या. मयुरनगर येथील एस.आर.ए इमारतींचे अभिहस्तांतरण, प्रभाग क्र. ५२ मधील विकास आराखड्यानुसार डीपी रोड विकासकाकडून हस्तांतरीत करुन घेणे, बंजारापाडा, कन्यापाडा, शिवाजीनगर, वडारपाडा, गोकुळधाम येथे ६ इंच व्यासाची पाण्याची लाईन जोडणे, बिंबीसारनगर व वनराई वसाहत येथील उद्यानांचे हस्तांतरण आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे बंगाली कंम्पाऊंड येथील मे. ज्योती बिल्डर डेव्हलपर यांच्याकडून मनपाला हस्तांतरीत करावयाची उद्याने, रस्ते आदी सुविधा अद्याप हस्तांतरीत करण्यात न आल्याने त्या तात्काळ करून घ्याव्यात, अशा सुचनाही आमदार वायकर यांनी मनपाच्या संबंधित अधिकार्यांना दिल्या.