- मनोहर कुंभेजकर मुंबई- गोरेगावची नवी सांस्कृतिक ओळख पश्चिम उपनगरातील तमाम नागरिक व नाट्य रसिकांना होणार आहे. कारण विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ नाट्यगृह व बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहानंतर आता गोरेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारण गेली अनेक वर्षे गोरेगावकर आतुरतेने वाट पाहात असलेल्या गोरेगावात 800 आसनी सुसज, अत्याधुनिक प्रभाकर पणशीकर नाट्यगृह व 210 गाळे विक्री असलेले टोपीवाला मंडई आणि 53 सदनिका असलेली सुसज्ज इमारत येथे भविष्यात साकारणार आहे.या कामासाठी पालिकेने 122 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. आपल्या नाट्य अभियानाने तमाम नाट्यरसिकांना भुरळ घालणारे आणि दर्जेदार नाट्य कलाकृती साकारणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रभाकर पणशीकर यांचे नाव या नाट्यगृहाच्या देण्याचा प्रस्तावाला पालिका सभागृहाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. येत्या सोमवार 30 जुलै रोजी शिवसेना नेते व युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता भूमिपूजन सोहळा होणार आहे. येथील नाट्यगृह व मंडईसाकारण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते व गोरेगावकर असलेले सुभाष देसाई यांच्या गेल्या 25 वर्षांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले असून गोरेगावकरांचे येथे नाट्यगृह पाहिजे हे स्वप्न आता भविष्यात साकारणार आहे. सोशल मीडियावर आणि गोरेगावात या नाट्यगृहाच्या भूमीपूजन सोहळ्याचे गोरेगाव शिवसेनेचे बॅनर व होर्डिंग झळकले आहेत.या भूमिपूजन सोहळ्याला उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर, पालिका आयुक्त अजोय मेहता,शिवसेना विधिमंडळ मुख्यप्रतोद व आमदार सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत, महिला विभागसंघटक व स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) साधना माने व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या बॅनरवर देण्यात आली आहे.
गोरेगावची होणार नवी सांस्कृतिक ओळख, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार भूमिपूजन सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 9:02 PM