पालिकेची पश्चिम उपनगरातील पहिली संकल्पना
मनोहर कुंभेजकर
मुंबई : गोरेगाव पूर्व येथील जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग हा नेहमी एक गजबजलेला आणि मुख्य रस्ता आहे. आता या जंक्शनवर उपनगराचे पालक मंत्री व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून वरळीप्रमाणे बसवलेली पूर्ण प्रकाशित स्मार्ट सिग्नल पोल यंत्रणा येत्या १५ मेपर्यंत बसवली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण वॉर्डतर्फे मुंबई सुशोभीकरण निधीअंतर्गत बसवण्यात येणारी अशा प्रकारची अद्ययावत अशी ही पश्चिम उपनगरातील पहिलीच सिग्नल यंत्रणा आहे. यामुळे गोरेगावचा ओबेरॉय जंक्शन परिसर आता पूर्ण प्रकाशित स्मार्ट पोल सिग्नल यंत्रणेने झळकणार आहे.
या कामाला गुरुवारपासून सुरुवात होणार असून येत्या १५ मेपर्यंत सदर काम पूर्ण होईल अशी माहिती शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशी विधानसभेचे स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी ‘लोकमत’ला दिली.
येथील ओबेरॉय मॉलमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीला येतात. त्यामुळे नेहमी पादचारी व वाहनांची गर्दी असते. अशा वेळी सिग्नल पाहून रस्ता ओलांडणे कठीण असून अनेक वेळा सिग्नल दिसत नाही. त्यामुळे वरळीप्रमाणे बसवलेली पूर्ण प्रकाशित अद्ययावत सिग्नल यंत्रणा बसवावी, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी पी दक्षिण वॉर्डचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्याकडे ४ मार्चच्या पत्राद्वारे केली होती.
याबाबत पालिकेचे मेंटेनन्स खात्याचे सहायक अभियंता ओंकार गिरकर यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही पाहणी केली असून सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारपासून या कामाला रीतसर सुरुवात होईल. येथे प्रस्तावित असलेल्या सिग्नलच्या खांबावर स्मार्ट लाइट पोलसोबतच आमदार सुनील प्रभू यांच्या सूचनेप्रमाणे पूर्ण प्रकाशित यंत्रणेची तांत्रिक शक्यता आम्ही पडताळून पाहत असून येथे सदर अद्ययावत पूर्ण प्रकाशित स्मार्ट सिग्नल यंत्रणा लवकरच उभारली जाईल, अशी माहिती गिरकर यांनी दिली.
यामध्ये फिरता सीसीटीव्ही कॅमेरा, चार डेकोरेटिव्ह लाइट असतील. विशेष म्हणजे हा स्मार्ट डेकोरेटिव्ह पोल वायफायने जोडला जाईल आणि त्यांचे नियंत्रण पी दक्षिण वॉर्डमध्ये असेल. पालिकेला कोणती महत्त्वाची सूचना नागरिकांना द्यायची असेल तर ती डिजिटलच्या माध्यमातून देता येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
----------------------