मराठीतून शिकण्याची संधी मिळाली आणि इंजिनिअरिंगचे प्रवेश वाढले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 08:18 AM2023-11-21T08:18:02+5:302023-11-21T08:18:41+5:30
डिप्लोमाच्या केवळ १२ टक्के जागा रिक्त, आयटीला वाढती मागणी
रेश्मा शिवडेकर
मुंबई : पाच वर्षांपूर्वी केवळ ४० टक्क्यांच्या आसपासच प्रवेश असलेल्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे प्रमाण ८७ टक्क्यांवर गेले आहे. आयटी, संगणक या अभ्यासक्रमांना वाढती मागणी, नोकरीची वाढती संधी ही कारणे या वाढीमागे आहेत. त्याचबरोबर प्रथम वर्षाला इंग्रजीसोबतच मराठी आणि हिंदीतून शिकण्याची (द्विभाषिक माध्यम) संधी देणाऱ्या संस्थांची वाढती संख्याही पदविका अभ्यासक्रमांच्या पथ्यावर पडली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत (एनईपी) २०२० पासून संस्थांना द्विभाषिक अभ्यासक्रम राबविण्यास परवानगी देण्यात येत आहे. २०२१-२२ मध्ये १८१, २०२२-२३ मध्ये १६३, २०२३-२४ मध्ये १७५ संस्थांनी प्रथम वर्षाकरिता द्विभाषिक माध्यमातून शिकण्याची संधी दिली. मराठी माध्यमातून शिकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होत असून दरवर्षी सुमारे ४० टक्के विद्यार्थी हा पर्याय निवडत आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालक विनोद मोहितकर यांनी लोकमतला दिली.
गेल्या काही वर्षात पदविका अभ्यासक्रमाच्या मुलांना चांगल्या प्लेसमेंट मिळू लागल्या आहेत. अनेकांना कॅम्पसवर मुलाखतीतच नोकरी मिळून जाते.
- विनोद मोहितकर, तंत्रशिक्षण संचालक
nसरकारी महाविद्यालयांमधील तब्बल ९७ टक्के जागा भरल्या गेल्या आहेत तर अनुदानित संस्थांमध्ये ९० हून अधिक जागांवर प्रवेश झाले आहेत.
nऔरंगाबादमधील सर्वच्या सर्व १० सरकारी संस्था, अमरावतीतही जवळपास १०० टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. राज्यात सरकारी, अनुदानित आणि खासगी मिळून ३८८ संस्था आहेत.
n२२१ संस्थांमध्ये क्षमतेच्या ७० टक्क्यांहून अधिक प्रवेश झाले आहेत तर ११० संस्थांमध्ये ३० ते ७० टक्क्यांदरम्यान प्रवेश झाले आहेत. केवळ ५७ संस्थांमध्ये ३० टक्क्यांहून कमी प्रवेश झाले आहेत.
सीईटीचा ताण टाळण्यासाठी...
दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. पदविका केलेल्या विद्यार्थांना पुढे अभियांत्रिकीच्या पदवीला दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो. सीईटीचा ताण टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी पदविकेचा मार्ग निवडतात.
यंदा अमरावती, पुणे, औरंगाबाद या भागात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. पदविकेच्या एक लाख दोन हजार जागा राज्यभर उपलब्ध असून त्यापैकी ८६,४६५ जागांवर २०२३-२४ या वर्षात प्रवेश झाले आहेत.