डोंबिवली : दहावीला काही विद्यार्थ्यांना गुण जास्त मिळाले. त्यांचा प्रवेश निश्चित होणार आहे. काही विद्यार्थ्यांना गुण कमी मिळाले. त्यांनी काय करायचे? त्यांना आता प्रवेशाची चिंता सतावणार आहे. मात्र, कमी गुण मिळाले म्हणून काय झाले? त्यांनी खचून न जाता त्यांच्या पालकांसह विद्यार्थ्यांना मानसिक व शैक्षणिक समुपदेशन करावे यासाठी डोंबिवलीतील दक्ष नागरिक संघ आणि ईगल ब्रिगेड यांनी संयुक्तरीत्या विनामूल्य विशेष अभियान हाती घेतले आहे.दहावीचा निकाल १७ जूनला लागला. त्यांच्या हाती गुणपत्रिका आल्यानंतर प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकरावीत पुढे कोणती शाखा निवडायची? गुण कमी असल्यावर कोणत्या संधी उपलब्ध आहेत? त्यातून खचून न जाता काय करावे? याचे समुपदेशन करण्याचे काम ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानाद्वारे दररोज ६०पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून शैक्षणिक मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती संघाचे प्रमुख विश्वनाथ बिवलकर यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
कमी गुण मिळाले ? आमच्याशी संवाद साधा
By admin | Published: June 23, 2014 2:29 AM