Join us

खडी मिळाली; पण पुरवठा कमी

By admin | Published: May 07, 2017 5:07 AM

बऱ्याच प्रयत्नांनंतर रस्त्यांच्या कामांसाठी खडी मिळवण्यात महापालिकेला यश आले आहे. रायगड जिल्ह्यातील उरण येथून हा माल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बऱ्याच प्रयत्नांनंतर रस्त्यांच्या कामांसाठी खडी मिळवण्यात महापालिकेला यश आले आहे. रायगड जिल्ह्यातील उरण येथून हा माल मुंबईत येत आहे. मात्र खडीच्या पुरवठ्याहून मागणी अधिक असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम रखडण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दगडखाणींवर हरित लवादाने बंदी आणली आहे. त्यामुळे मुंबईला खडीचा पुरवठा बंद झाला आहे. माल मिळत नसल्याने ठेकेदारांनी रस्त्यांचे काम थांबवले आहे. यामुळे पावसाळ्यात मुंबईतील रस्ते खड्ड्यात जातील, अशी भीती व्यक्त होत आहे. याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटल्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी रात्री तातडीने रस्त्यांची पाहणी केली.रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लागण्यासाठी मुंबईला खडीचा पुरवठा करणाऱ्या दगडखाणींवरील बंदी उठविण्याची विनंती शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. दरम्यान, ठेकेदारांनी उरणवरून खडीचा साठा मिळवण्यास सुरुवात केली आहे. परंतु मुंबईत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने त्या तुलनेत खडीचा पुरवठा कमी असल्याचे समोर आले आहे.महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृह नेते यशवंत जाधव यांच्याबरोबर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दक्षिण आणि मध्य मुंबईतील रस्त्यांच्या पुनर्विकास कामांची पाहणी केली. बोमन बेहराम रोड, नागिनदास मास्तर रोड, चर्चगेट जंक्शन, बाबुलनाथ रोड, ताडदेव, रजनी पटेल चौक, सिद्धिविनायक जंक्शन, केळकर रोड, शिवनेरी जंक्शन दादर टी. टी., सुलोचना शेट्टी जंक्शन आदी रस्त्यांच्या पुनर्विकासाची कामे सुरू असून, खडीअभावी ती रखडण्याची भीती आहे. शिवसेना-भाजपा ‘खडी’युद्धदगडखाणी बंद करून रस्त्यांची कामे ठप्प करणे हे भाजपाचे षड्यंत्र असल्याचा आरोप सभागृह नेते यशवंत जाधव यांनी स्थायी समितीत केला होता. तर दगडखाणी बंद केल्याने रस्त्यांची कामे रखडल्याचे खापर तुम्ही मुख्यमंत्र्यांवर फोडू नका, अशी भूमिका घेत भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी शिवसेनेला सुनावले होते. ५० हजार क्युबिक मीटर खडीची गरज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे नियम पाळत नसलेल्या ७० दगडखाणींवर ३१ मार्चपासून बंदी आहे. रस्त्यांच्या पावसाळ्यापूर्व कामांसाठी महापालिकेला ५० हजार क्युबिक मीटर खडीची गरज आहे. मात्र नवी मुंबईतील दगडखाणींवर बंदी आल्याने ठेकेदारांना मुंबईबाहेरील दगडखाणींतून खडी घ्यावी लागत आहे.