"मागची पिढी बिघडतेय त्याला कारणीभूत गौतमी पाटीलच", छोटा पुढारी पुन्हा संतापला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 12:55 PM2023-05-23T12:55:19+5:302023-05-23T12:56:10+5:30
तुम्ही जी मुसंडी मारताय ती चुकीच्या पद्धतीनं मारताय, तुम्ही योग्य पद्धतीने मुसंडी मारा.
लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील आणि महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांच्या चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. घनश्याम दरोडे याचा मुसंडी नावाचा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असताना, पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना घनश्यामने गौतमी पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला. महाराष्ट्राचा बिहार करू नका, अशा शब्दात गौतमी पाटीलला सुनावलं होतं. त्यावर, तुम्हाला मीच दिसते का, असा प्रतिसवाल गौतमीने केला होता. आता, पुन्हा एकदा घनश्याम दरोडेने गौतमीला चॅलेंज केलं आहे. तसेच, मागची पिढी तुमच्यामुळेच बिघडत असल्याचंही घनश्याम यांनी म्हटले.
तुम्ही जी मुसंडी मारताय ती चुकीच्या पद्धतीनं मारताय, तुम्ही योग्य पद्धतीने मुसंडी मारा. आपण जुन्या कलाकारांचा इतिहास पाहायला पाहिजे. सुवर्णाताई असतील, खेडकर असतील हे जे तमाशा कलावंत आहेत, ते कलावंत कसे कार्यक्रम करत होते. ही लावणी परंपरा जपून राहिली पाहिजे, असे म्हणत छोटा पुढारी घनश्याम दरोडे याने गौतमी पाटीलला पुन्हा डिवचलं. तसेच, धनश्याम दादाचं तुम्हाल ओपन चॅलेंज आहे, तुम्हाला जर महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्र काय आहे, यासाठी आमचा मुसंडी चित्रपट पाहा. ९ जून रोजी महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होतोय. मग, तुम्हाला कळेल महाराष्ट्राची कला आणि संस्कृती कशी असते.
तरुण पिढीला चांगलं वळण लावता येत नसेल तर चुकीचंही वळण लावू नका. मागची जी पिढी आहे, ती फेसम होण्यासाठी गौतमी पाटील यांचा आदर्श घेते, त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकते. मग, मागचे जे कलावंत बिघडत आहेत, त्याला कारणीभूत गौतमी पाटील ह्याच आहेत, असेही दरोडे यांनी म्हटले. तसेच, आमचा विरोध तुम्हाला नसून तुमच्या कार्यक्रमांना नाही, तुमच्या हातांना आमचा विरोध आहे, तुम्ही जरा तुमची हात बदला, असेही दरोडे यांनी सूचवले.
काय म्हणाली होती गौतमी पाटील
'मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का? माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा?', असा सवाल गौतमी पाटीलने घनश्याम दरोडे यांस केला.