मुंबई - पुण्यातील मनसेच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेला जय महराष्ट्र करुन राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे, पुण्यातील मनसेचं आणि मनसेच्या महिला आघाडीचं मोठं नुकसान झालं आहे. एकीकडे मनसे नेत्याच्या पक्ष सोडल्याची चर्चा असतानाच, दुसरीकडे मनचिसेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलेलं ट्विटही चांगलंच चर्चेत आलं आहे. उदय सामंत हे मनसेत प्रवेश करणार असल्याचंसदर्भात त्यांनी उपहासात्मक ट्विट केलंय.
मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि वरूण सरदेसाई यांची भेट घेतली होती. या भेटीचा एक फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्या भेटीनंतर अभिजीत पानसे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता मनसेकडून खुलासा करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याबाबत एक पोस्ट करत या भेटीवरुन सुरु असलेल्या चर्चां फोकनाड असल्याचं म्हटलंय.
“गौप्यस्फोट!!! अभिजीत पानसे यांनी उदय सामंत यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण वगैरे आलंय. पानसे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार अशी कुजबूज सुरु झाली. पण, खरी बातमी तर अशी आहे की उदय सामंत मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. म्हणून तर ते पानसेंना गुप्तपणे भेटले. (फोकनाड सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुड्या सोडायला फार डोकं लागत नाही हेच खरं),” असे उपहासात्मक ट्विट अमेय खोपकर यांनी केले आहे.
अमेय खोपकर यांच्या या ट्विटनंतर ठाण्यातील मनसेचे नेते अविनाथ जाधव यांनी संपूर्ण घटनेचा तपशील सविस्तरपणे दिला आहे. “अभिजीत पानसे-उदय सामंत यांच्या भेटीचा फोटो खरा आहे. पण त्या फोटो मागचे आणि भेटीमागचे कारण म्हणजे, येत्या १९ तारखेला ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे मनसेची शिक्षण परिषद होणार आहे. याच परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री म्हणून अभिजीत पानसे यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मंत्री उदय सामंत आणि वरूण सरदेसाई यांची भेट घेतली होती. या परिषदेचे आमंत्रण राज ठाकरे यांनाही असून यात अनेक शिक्षण तज्ञही सहभागी होणार आहेत,” असे जाधव यांनी स्पष्ट केले.