मुंबई: शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यामुळे मुलांची पावले आता आपोआप मैदाने आणि उद्यानांकडे वळू लागली आहेत. परंतु, मुंबई शहरामध्ये खेळायला मैदाने आणि उद्यानांची मोठी कमतरता असल्याचे दिसून येते. त्यात भर म्हणून की काय, जी उद्याने शहरात आहेत त्यातील बहुतेकांची दुरवस्था झाली आहे. त्यासाठी पालिकेचे गोवंडीतील राजर्षी शाहू महाराज उद्यान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे उदाहरण देता येईल.शिवाजीनगरमधील जिजाबाई भोसले मार्गाला लागून दोन्ही उद्याने आहेत. या उद्यानांकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. या उद्यांनाची दररोज साफसफाई होत नसल्याचे उद्यानात खेळणाऱ्या मुलांनी सांगितले. उद्यानामधील विजेचे जवळपास सर्वच दिवे हे बंद पडले आहेत. तर उरलेले दिवे फुटले आहेत. आंबेडकर उद्यानाला प्रवेशद्वार आणि पहारेकरी नसल्याने अंधाराचा फायदा घेऊन दारुडे या उद्यानांत मुक्तपणे दारू प्यायला बसतात, असे स्थानिकांनी सांगितले. उद्यानांची वेळ बाहेरील फलकावर दर्शवलेली नसल्यामुळे मुलांची गैरसोय होते. राजर्षी शाहू उद्यानामध्ये लहानशी खुली व्यायामशाळा आहे, तीदेखील अनेक ठिकाणी खचली आहे. व्यायामशाळेच्या जागेवर खड्डे पडले आहेत. जिमच्या साहित्याला गंज चढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या जिमचा वापर कोणीही केलेला नाही. (प्रतिनिधी)
गोवंडीतील उद्यानांची दुरवस्था
By admin | Published: April 19, 2017 1:03 AM