लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोवंडी, देवनार, मानखुर्द या झोपडपट्टीबहुल भागांमधील समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या मदतीने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ‘क्लॅप’ (कम्युनिटी लेड ॲक्शन, लर्निंग ॲण्ड पार्टनरशिप) हा पथदर्शी प्रकल्प या विभागात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा भाग असलेली ‘आय-कॉल’ ही विनामूल्य हेल्पलाइन सेवा गुरुवारी सुरू करण्यात आली आहे.
‘एम/पूर्व’ म्हणजेच गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर आदी भाग अनियोजित स्वरूपात विखुरलेल्या वस्तींनी व्यापलेला आहे. या विभागांतील नागरिकांच्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी ‘ट्रान्सफॉर्मिंग एम वॉर्ड’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यात ‘क्लॅप’ हा प्रकल्प राबविला जात आहे. या पथदर्शी प्रकल्पात एम/पूर्व विभागामध्ये २४ वस्त्यांमधील सुमारे ६० हजार घरांपर्यंत पोहोचण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. या प्रकल्पांतर्गत असलेल्या आय-कॉल उपक्रमाची सुरुवात अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आली. आय-कॉल हेल्पलाइनच्या माध्यमातून विविध माहिती आणि सल्ले पुरविताना संबंधितांच्या वर्तणुकीत असे सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणखी भरीव प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.
असा आहे क्लॅप उपक्रम
वस्ती पातळीवर लोक सहभागातून कम्युनिटी केअर सेंटर उभारणे, सामुदायिक प्रयत्नातून स्थानिक पातळीवर शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे, जीवनमानाचा आर्थिक स्तर उंचावणे आणि या तीनही बाबींमध्ये संवाद, समन्वय व संपर्काचा माध्यम म्हणून आय-कॉल या हेल्पलाइनचा उपयोग करणे, या प्रमुख चार बाबी क्लॅप प्रकल्पामध्ये समाविष्ट आहेत.
अशी मिळेल हेल्पलाइनची मदत
‘एम/पूर्व’ विभागात सुरू झालेल्या हेल्पलाइनद्वारे स्थानिक नागरिकांना मानसिक ताणतणाव, भीती अशा मानसिक समस्यांतून सोडविणे. त्यांना स्थानिक पातळीवरील शिधावाटप, आरोग्य, रोजगार, वैद्यकीय सल्ला व माहिती देणे. तसेच निरनिराळ्या शासकीय योजना व उपक्रमांची माहिती देणे हेदेखील यातून साध्य होणार आहे, अशी माहिती टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या डॉ. अपर्णा जोशी यांनी या वेळी दिली.