प्राची सोनवणे , नवी मुंबई ठाणे-बेलापूर पट्टीमधील बेलापूर इथल्या किल्ल्यावर असलेल्या गोवर्धनी मातेच्या मंदिरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. नोकरी - धंद्यासाठी मुंबई-ठाणे व आजूबाजूच्या परिसरात स्थलांतरित झालेले इथले रहिवासी नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने गोवर्धनी मातेच्या दर्शनाला आवर्जून येतात. या नवरात्रौत्सवात भजन-कीर्तन आदी धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम राबविले जातात. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या देवीच्या दर्शनासाठी रायगड, ठाणे, नवी मुंबई परिसरातील भाविकांनी गर्दी केली आहे. दोनशे वर्षांपूर्वी रेतीबंदर परिसरात मासेमारी करताना रामा चिमाजी भगत यांना गोवर्धनी मातेची पाषाण मूर्ती सापडली होती. यानंतर देवीने भगत यांना दृष्टांत देऊन किल्ले गावठाण येथे स्थापना करण्यात आली. या परिसरात ग्रामस्थ गाई चारण्यासाठी आणत असल्याने या देवीला गोवर्धनी माता असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. ही माता आगरी-कोळी व ब्राह्मण-सोनारांची कुलस्वामिनी आहे. मातेचे जुने मंदिर दगडी बांधकामाचे होते. १९५२ साली येथे श्री गोवर्धनी माता मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. ट्रस्टच्या माध्यमातून मातेची सर्व वैदिक व नित्य पूजा करण्यात येऊ लागली. त्यानंतर २००८ साली आमदार मंदा म्हात्रे यांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. या मंदिराचे बांधकाम दाक्षिणात्य पध्दतीने असून प्रशस्त असा सभामंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी असलेल्या गाभाऱ्यात मातेची पूर्वाभिमुख चांदीचा मुखवटा असलेली प्रसन्न मुद्रा असून जवळ गाईचीही मूर्ती आहे. मातेच्या डाव्या हाताला गणपती व उजव्या हाताला हनुमानाची मूर्ती आहे. मंदिरात सकाळी सात वाजता आरती, अभिषेक नित्य पूजा चालते. आमदार मंदा म्हात्रे यांच्या वतीने गोवर्धनी माता मंदिर परिसरात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. किल्ले गावठाण महिला मंडळ तसेच बेलापूर महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ९ आॅक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि सोमवारी १० आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता नवचंडी होम होणार आहे. दररोज सकाळी व संध्याकाळी ७.३० वाजता भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे.
गोवर्धनी माता मंदिरात भक्तांची रीघ
By admin | Published: October 05, 2016 3:19 AM