Join us  

शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था

By admin | Published: April 15, 2015 10:41 PM

ब्रिटिशकालीन बांधलेले दासगावमधील शिवकालीन तलावाच्या जवळ असलेले शासकीय विश्रामगृह सध्या डागडुजी, सोयी- सुविधांअभावी शेवटची घटका मोजत आहे.

सिकंदर अनवारे - दासगावब्रिटिशकालीन बांधलेले दासगावमधील शिवकालीन तलावाच्या जवळ असलेले शासकीय विश्रामगृह सध्या डागडुजी, सोयी- सुविधांअभावी शेवटची घटका मोजत आहे. नेहमी गजबजलेल्या शासकीय विश्रामगृहाचा परिसर सध्या भकास झाला असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.दासगाव हे शिवाजी महाराजांच्या टेहळणीचे ठिकाण होते. दासगाव गावाची व दौलतगड किल्ल्याची महाराजांनी निर्मिती केली होती. पूर्वी काळात दासगाव हे मोठे बंदर होते. मुंबई व देशाच्या इतर ठिकाणाहून कोकणात जाण्यासाठी दासगाव बंदर हे एकमेव ठिकाण होते. ब्रिटिशांनी या परिसराचा अभ्यास करत व परिसरातील सौंदर्य न्याहाळून शिवकालीन तलावाच्या शेजारी एका दोन खोल्यांच्या छोट्याशा विश्रामगृहाचे बांधकाम केले. या परिसरात येणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचा विचार करूनच हे ठिकाण निवडण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर हे विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निगराणीत आहे. सुरुवातीला काही काळ विश्रामगृहाची नियमित डागडुजी करण्यात येत होती. गेल्या वर्षभरापासून या विश्रामगृहाकडे महाडच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने पाठ फिरवली आहे. सध्या या ठिकाणी दोन खोल्यांचे बांधकाम एक जनरल व एक व्हीआयपी असे आहे. याचा वापर नोंदीनुसार गेली वर्षभरापर्यंत करण्यात आलेला आहे. परंतु सध्या बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पहावयास मिळत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते चिपळूण यादरम्यान असणारे हे एकमेव शासकीय विश्रामगृह असल्याने रात्री महामार्गावरून गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विश्रांतीचा आधार आहे तर रायगडावर येणाऱ्या पर्यटकांना देखील जवळपासचा विश्रांतीचा एक आधार आहे. या विश्रामगृहाचे अनेक चित्रपटासाठी चित्रीकरणही करण्यात आल्याचे पहावयास मिळत आहे. अशा या ब्रिटिशकालीन बांधकाम केलेल्या या विश्रामगृहाकडे महाड सार्वजनिक बांधकाम खात्याने पाठ फिरविल्याची नागरिकांकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे. दासगावच्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचा काडीचाही उपयोग नसून शासनाला एक रुपयाचा फायदा नाही. या इमारतीची डागडुजी करणे किंवा वीज बिल भरून काही उपयोग नाही. तरी ही इमारत तोडण्यासाठी वरच्या खात्याकडे शिफारस करणार आहे. -आय. आर. विनोदन, उपविभागीय अधिकारी,बांधकाम विभाग, महाडदासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे गावापासून खूप दूर आहे. रुग्णांना या ठिकाणी येण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. पुन्हा ये-जा करण्यासाठी गाडीला भाडे मोजावे लागते. अशावेळी दासगाव शासकीय विश्रामगृह हे न तोडता या ठिकाणी उपप्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी ही इमारत आरोग्य विभागाकडे वर्ग करावी. - डॉ. एस. के. घोडके, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र दासगांव