मुंबई- राज्यातल्या गड-किल्ल्यांवर मद्यपान करण्यास सरकारनं बंदी घातली असून, गृहमंत्र्यांनी तसा अध्यादेश काढला आहे. गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी तिथे मद्यपान करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. तसेच गडकिल्ल्यांवर दारू पिऊन विटंबणा केली जात असल्याबाबतही राज ठाकरेंनी आवाज उठवला होता. त्यानंतर आता सरकारला जाग आली आली असून, सरकारनं गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास 10 हजारांचा दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद केली आहे.
महाराष्ट्रात 350हून अधिक गडकिल्ले हे इतिहासाच्या साक्षीनं उभे आहेत. त्याच गडकिल्ल्यांची बऱ्याचदा विटंबणा केली जाते. गडकिल्ल्यांवर हुल्लडबाज दारूच्या पार्ट्या करतात. त्याच पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी गडकिल्ल्यांवर दारू पिण्यास बंदी घातली असून, दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. हुल्लडबाजी करणाऱ्यांना सश्रम कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद केली आहे.
राज्यातील गडकिल्ल्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. एकेकाळी स्वराज्यांचा भाग असलेल्या गडकिल्ल्यांकडे पिकनिक स्पॉट म्हणून पाहिलं जात आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांच्या पावित्र्याचं जपणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचा हा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असताना, त्याला गालबोट लागू न देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भावना शिवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. गडकिल्ल्याचं पावित्र्य राखण्यासाठी प्रत्येक गडकिल्ल्यावर किमान दोन सुरक्षारक्षक नेमण्याची गरज असल्याचे मत शिवप्रेमींनी व्यक्त केलं आहे.