मुंबई : शासकीय वसाहतीतील रहिवासी कर्मचाऱ्यांना हुसकावून लावत, ही जागा विकासकाच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. मात्र, या परिसरातून एकाही रहिवाशाला स्थलांतरित होऊ देणार नाही, अशा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीतील रहिवाशांना माफक दरात घरे उपलब्ध करून द्यावी. या मागणीसाठी शुक्रवारी वसाहतीतील रहिवाशांनी दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी रहिवाशांना वांद्रे येथेच स्वत:च्या मालकीची घरे देण्यात यावीत, सार्वजनिक बांधकाम विभागाची येणारी नोटीस, घराचा स्लॅब कोसळण्याच्या घटना इत्यादी समस्या राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्या.वसाहतीत राहून आम्हाला कित्येक वर्षे झाली, परंतु हक्काच्या घरासाठी सरकार आम्हाला आश्वासनाव्यतिरिक्त काहीच देत नाही. मुख्यमंत्र्यांनी वसाहतीत येऊन आश्वासने दिली होती. मात्र, आश्वासनाच्या पलीकडे प्रशासन ठोस भूमिका घेत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग नोटीस पाठवून रहिवाशांना घाबरवत आहे, असे मुद्दे रहिवाशांनी मांडले.या वेळी राज ठाकरे म्हणाले की, तुम्हाला जे कोणी पत्र आणि नोटीस पाठवित आहे. त्यांना पत्र पाठवून एवढेच सांगा की, राज ठाकरेंना पत्र व नोटीस पाठवा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. दरम्यान, शासकीय वसाहतीचा पुनर्विकास आणि रहिवाशांना माफक दरात घरे मिळावी, याबाबतची मनसेची भूमिका काय आहे. यावर १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता वांद्रे कम्युनिटी हॉलमध्ये राज ठाकरे सभा घेणार आहेत, अशी माहिती रहिवासी रूपेश रेगे यांनी दिली.
शासकीय वसाहतीतील रहिवाशांना स्थलांतरित होऊ देणार नाही : राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 3:49 AM