मुंबई - लालबागचा राजा मंडळात काल घडलेल्या संतापजनक प्रकाराबाबत अनेक प्रक्षोभक प्रतिक्रिया बाहेर आल्या. त्यानंतर घडलेल्या प्रकारची दखल घेत त्याची चौकशी करण्यासाठी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे नुकतेच लालबागचा राजा मंडळाच्या मंडपात दाखल झाले. डिगे काल आयपीएस अधिकाऱ्यासोबत केलेल्या धक्काबुक्की आणि अरेरावी केल्याप्रकरणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे चौकशी केली. लागलीच आयुक्तांनी घेतलेल्या या दखलीमुळे लालबागचा राजा मंडळावर सरकारचे तर नियंत्रण येणार नाही ना ? असा सवाल निर्माण झाला आहे. धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्याशी 'लोकमत'ने बातचीत केली असता त्यांनी मी मंडळात जाऊन लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांच्याशी काल घडलेल्या प्रकारची चौकशी केली. तसेच व्हीआयपी व्यक्तींच्या दर्शनाच्या रांगेची पाहणी केली असून कालच्या सारखा प्रकार घडू नये यासाठी काळजी घ्या असे डिगे सांगितले. डिगे यांना सचिव साळवी यांनी कालचे प्रकरण मिटले असून पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याची ग्वाही दिली.
या मंडळाच्या सुरक्षेसाठी दरवर्षी राज्य सरकारचे गणेशोत्सवादरम्यान लाखो रुपये खर्च होतात. तसेच या मंडळात कार्यकर्त्यांची वाढलेली मुजोरी पाहता समाजातून या मंडळावर सरकारचे नियंत्रण असावे अशा चर्चांना गेल्या अनेक वर्षांपासून उधाण आले आहे. मात्र, या मंडळात दरवर्षी होणारी दादागिरीला लगाम लावण्यासाठी राज्य सरकार महत्वाचे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी, पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की