Join us

सरकारला स्वभाषेचे प्रेम नाही- भालचंद्र नेमाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 2:17 AM

‘आकाशदीप ’ जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

मुंबई : माझ्या देशाच्या खेडोपाड्यात आदिवासी आश्रमशाळांमध्ये इंग्रजी भाषा शिकविण्याचे धोरण पसरत आहे. संस्कृतीरक्षक म्हणवणारे सरकार इंग्रजी भाषेला प्रोत्साहन देत आहेत. सरकारलाच आपल्या स्वभाषेवर प्रेम नाही, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक ‘कोसलाकार’ भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली.अमर उजाला फाउंडेशनचा वार्षिक पुरस्कार सोहळा शनिवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या सोहळ्यात हिंदी साहित्यिक ज्ञानरंजन आणि मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ‘आकाशदीप’ या जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ कवी गुलजार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे. याप्रमाणे या सोहळ्यात लेखक अब्दुल बिस्मिल्लाह, ज्ञान चतुर्वेदी, गगन गिल, अरुण कमल,र् , ज्योतिष जोशी आणि अंबर पांडेय यांनाही गौरविण्यात आले.नेमाडे म्हणाले की, मातृभाषेत शिक्षण घेतल्याने फक्त ज्ञान मिळते, इंग्रजी भाषेतून केवळ माहिती मिळते. स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षांनंतरही आपण अजून गुलामगिरीत आहोत. स्पर्धात्मक युगासाठी आपण इंग्रजी भाषेचे गुलाम झालो आहोत. या सोहळ्यात ज्येष्ठ कवी गुलजार यांनी सांगितले की, सर्व भाषांची वैविध्यता आपल्याकडे आहे. मीही त्याचे प्रतिनिधित्व करतो.

टॅग्स :गुलजार