मुंबई - सत्ताधारी सरकारच्या आमदारांनी विधानपरिषदेत गोंधळ घातला. एखाद्या समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सत्तापक्षाकडून त्या प्रश्नाची पुकारणा करायच्या अगोदर ज्याप्रमाणे गोंधळ घालण्यात आला. त्यावरुन फडणवीस आणि ठाकरे सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचं नाही, हेच स्पष्ट होत असल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
विधानपरिषदेत धनंजय मुंडे यांनी धनगर समाज आणि मंत्रिमंडळातील 16 मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचा प्रश्न उपस्थित केला होता. धनगर आरक्षणाचा मुद्दा 207 नियमान्वये चर्चेला येणार होता. मात्र, चर्चेतून हा विषय बाहेर येऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. सरकार भ्रष्टाचारावर चर्चा करायला तयार नाही. प्रश्नोत्ताराच्या तासाला पहिला प्रश्न धनगर आरक्षणाचा होता. पण, तोही प्रश्न चर्चेला येऊ नये म्हणून सत्ताधारी पक्षांचे आमदार गोंधळ घालत आहेत. त्यामुळेच, दिवसभराचे कामकाज तहकूब करण्यात आल्याचं धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
दरम्यान, विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आता धनगर आरक्षणाचा मुद्दा विरोधकांकडून उचलून धरण्यात येत आहे. धनगर समाजाला मागणीप्रमाणे आरक्षण द्यावं, यासाठी विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात येत आहे.