Join us  

"शर्ट फाडला, गळा धरला अन्..."; दंडाचे पैसे मागितले म्हणून एसी लोकलमध्ये टीसीला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 4:04 PM

मुंबईत एसी लोकलमध्ये सरकारी कर्मचाऱ्याने टीसीला मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mumbai Local : मुंबई लोकलमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. यामध्ये अनेक विनातिकीट प्रवाशांचा देखील समावेश असतो. त्यामुळे अनेकदा तिकीट तपासणाऱ्यांसोबत त्यांचे वाद देखील होतात. अशीच एक घटना पश्चिम रेल्वेमार्गावरील एसी लोकलमध्ये घडली आहे. तिकीट नसल्यामुळे दंडाची रक्कम भरा सांगणाऱ्या एका सरकारी टीसीला कर्मचाऱ्याने मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या मारहाणीत टीसी जखमी झाला. मात्र प्रवाशाने लिखीत स्वरुपात माफीनामा दिल्याने हे प्रकरण मिटवण्यात आले.

चर्चगेट-विरार जलद एसी लोकल ट्रेनमध्ये गुरुवारी एका प्रवाशाच्या बेशिस्त वर्तनामुळे गोंधळ उडाला होता. या वादाचे रूपांतर रेल्वे टीटीसोबत हाणामारीत झाले. चर्चगेट ते विरार एसी लोकल ट्रेनमध्ये फर्स्ट क्लासचे तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढलेल्या तीन प्रवाशांनी मुख्य तिकीट निरीक्षकाला मारहाण केली. या घटनेदरम्यान, जसबीर सिंग हे किरकोळ जखमी झाले. या घटनेचा व्हिडीओ डब्यातील तीन प्रवाशांनी रेकॉर्ड केला होता.

जसबीर सिंग यांनी या प्रवाशांना त्यांची तिकिटे दाखवण्यास सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिकीट चुकीचे असल्याचे समजल्यानंतर टीसीने त्यांना रेल्वेच्या नियमानुसार दंड भरण्यास सांगितले. त्यानंतर अनिकेत भोसले नावाच्या प्रवाशाने सिंग यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर अधिकाऱ्याने त्यांना पुढील बोरिवली स्थानकावर ट्रेनमधून उतरण्यास सांगितले. मात्र भोसले यांनी नकार दिला वाद घातला.

त्यानंतर अनिकेत भोसले यांच्यासह असलेले प्रवासी आणि टीसी जसबीर सिंग यांच्यात हाणामारी झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये प्रवाशांची आधी सिंग पाठलाग केला आणि नंतर त्यांना कोचच्या काचेवर धरून ठेवले. आरोपींनी अपशब्द वापरले आणि त्यांचा शर्ट फाडला. माहिती मिळताच, जीआरपी आणि आरपीएफ रेल्वेत चढले आणि त्यांनी प्रकरण हातात घेतले.

"जेव्हा ट्रेन बोरिवलीला पोहोचली, तेव्हा सिंग यांनी भोसले यांना उतरण्याची विनंती केली, पण भोसले यांनी नकार दिला. त्यांनी सिंग यांना शिवीगाळ केली आणि त्याच्यावर शारिरीक हल्ला केला. सिंग यांचा शर्ट फाडला. यादरम्यान सिंग यांनी इतर प्रवाशांकडून दंड म्हणून वसूल केलेले १,५०० रुपये हरवले. या भांडणामुळे ट्रेन बोरिवली येथे थांबवण्यात आली होती. त्यानंतर पुढे नालासोपारा स्थानकावर सिंग आणि भोसले रेल्वे पोलिसांसह ट्रेनमधून खाली उतरले.

या घटनेनंतर, आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी सरकारी नोकरी गमावण्याच्या भीताने भोसले यांनी आपली चूक मान्य केली आणि लेखी माफी मागितली. तसेच हरवलेले दीड हजार रुपये देण्याचेही मान्य केलं. जसबीर सिंग यांनीही त्यांना माफ करणे पसंत केले. त्यामुळे भोसले यांच्याकडून लेखी माफी मागितल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना सोडून दिले.

टॅग्स :मुंबईमुंबई लोकलसोशल व्हायरलपश्चिम रेल्वे