जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचं उद्या आत्मक्लेश आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 09:48 PM2018-10-01T21:48:06+5:302018-10-01T21:57:50+5:30
नव्या पेन्शन योजनेला विरोध; सरकारचा निषेध करणार
मुंबई : मृत्यूपश्चात शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करून भाजपा सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप जुनी पेन्शन हक्क संघटनेने केला आहे. नव्या पेन्शन योजनेसह शासन निर्णयाचा निषेध करण्यासाठी उद्या गांधी जयंतीच्या निमित्तानं आझाद मैदानात सकाळी १० वाजता आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे राज्य अध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खांडेकर म्हणाले की, रस्त्यावर उतरू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन दिंडीचा धसका घेतल्यानेच सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे. नव्या पेन्शन योजनेत स्पष्टता नाही. आजही हजारो मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांची कुटुंबे वाऱ्यावर आहेत. नव्या पेन्शन योजनेत सरकार शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापणारी रक्कम आणि सरकारची रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवत आहेत. म्हणजेच हजारो कोटी रुपये उद्योगपतींना वापरण्यास देत आहे. सर्व विरोधी पक्ष, आमदार, मंत्री यांना निवेदने दिल्यानंतरही प्रश्न सुटला नसल्याने आत्मक्लेश आंदोलन करत आहोत.
संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख प्राजक्त झावरे-पाटील म्हणाले की, याआधी ठाण्यापासून आझाद मैदानापर्यंत २ व ३ ऑक्टोबर रोजी पेन्शन दिंडी काढण्यात येणार होती. मात्र वेळकाढूपणा करत पोलिसांनी मोर्चाच्या दोन दिवसआधी परवानगी नाकारली. त्यानंतर सरकारनेही घाईघाईत शनिवारी १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला. याचाच अर्थ सरकार हे आंदोलन दडपू पाहत आहे. सरकारला सुबुद्धी मिळावी आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी हजारो शासकीय कर्मचारी मंगळवारी आझाद मैदानात आत्मक्लेश आंदोलनास बसतील.
नव्या पेन्शन योजनेला विरोध का?
केंद्र सरकारच्या सूचनेवरून महाराष्ट्रात २००५ साली नवी पेन्शन योजना लागू केली. मात्र केंद्र सरकारने २००९ साली योजनेत केलेले महत्त्वाचे बदल महाराष्ट्राने केलेले नाहीत. शिक्षकांच्या पेन्शन कपातीबाबत कोणतेही आकडेवारी किंवा स्पष्टता सरकारकडे नाही.
सेवेत असताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पत्नीला मिळणारे निवृत्ती वेतन, दिव्यांद मुलगा-मुलीस मिळणारे कुटुंब निवृत्ती वेतन, ग्रॅज्युटी (उपदान) ७ लाखांच्या मर्यादेत, अंशराशीकरण, भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा असलेली संपूर्ण रक्कम नव्या पेन्शन योजनेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मिळणार नाही. सेवेत असताना कर्मचाऱ्यायाला अपंगत्त्व आल्यास जुन्या पेन्शन योजनेत मिळणारे लाभही नव्या पेन्शन योजनेत सामील केलेले नाहीत.