मुंबई : मृत्यूपश्चात शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करून भाजपा सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप जुनी पेन्शन हक्क संघटनेने केला आहे. नव्या पेन्शन योजनेसह शासन निर्णयाचा निषेध करण्यासाठी उद्या गांधी जयंतीच्या निमित्तानं आझाद मैदानात सकाळी १० वाजता आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे राज्य अध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.खांडेकर म्हणाले की, रस्त्यावर उतरू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन दिंडीचा धसका घेतल्यानेच सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे. नव्या पेन्शन योजनेत स्पष्टता नाही. आजही हजारो मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांची कुटुंबे वाऱ्यावर आहेत. नव्या पेन्शन योजनेत सरकार शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापणारी रक्कम आणि सरकारची रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवत आहेत. म्हणजेच हजारो कोटी रुपये उद्योगपतींना वापरण्यास देत आहे. सर्व विरोधी पक्ष, आमदार, मंत्री यांना निवेदने दिल्यानंतरही प्रश्न सुटला नसल्याने आत्मक्लेश आंदोलन करत आहोत.
जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचं उद्या आत्मक्लेश आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 9:48 PM