झुंडशाहीला सरकारचं प्रोत्साहन- कन्हैया कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 05:35 AM2018-08-23T05:35:39+5:302018-08-23T06:44:25+5:30
लोकशाहीच्या जागी झुंडशाही आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. त्याला विरोध करणाऱ्यांना घाबरविण्यासाठीच सनातनसारख्या संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मोकळे रान दिले जात असल्याचा आरोपही कुमार यांनी केला.
मुंबई : सरकारविरोधात बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या मंडळींचा आवाज दडपण्याचा सरकारचा डाव आहे. म्हणूनच गौरी
लंकेश यांच्या मारेकऱ्यांवर, त्यांच्या संघटनेवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने बुधवारी केला. लोकशाहीच्या जागी झुंडशाही आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. त्याला विरोध करणाऱ्यांना घाबरविण्यासाठीच सनातनसारख्या संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मोकळे रान दिले जात असल्याचा आरोपही कुमार यांनी केला.
मुंबई प्रेस क्लब येथे ‘लोकसभा निवडणुका २०१९’ या विषयावरील चर्चासत्रात सहभागी झालेल्या कन्हैया कुमारने मोदी सरकारवर सडकून टीका केली. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशावर अघोषित आणीबाणी लादल्याचा आरोप कुमार यांनी केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकºयांची अचानक धरपकड सुरू झाली आहे. सीबीआयने पाच वर्षांपूर्वीच मारेकºयांचे रेखाचित्र जारी केले होते, परंतु इतक्या वर्षांत आरोपींची धरपकड झाली नाही. आता कर्नाटक पोलिसांचे तपास पथक कामाला लागल्यामुळेच दाभोलकरांच्या मारेकºयांची धरपकड सुरू झाल्याचा आरोप करीत, राज्य सरकारच्या कारवाईवर कन्हैया कुमारने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून देशात भयाचे वातावरण निर्माण केले जात आहे. धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करण्यासाठीे लोकांनी या सरकारला निवडून दिले नव्हते. यापूर्वीही माध्यमांवर सरकारचा दबाव होता. मात्र, त्याचे प्रमाण इतके नव्हते. आता लिहिण्यापूर्वी, बोलण्यापूर्वी लोकांना भीती वाटते, असा दावा कन्हैयाने या वेळी व्यक्त केला.
केंद्रातील सरकारकडे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. पेट्रोल महाग झाले, तर त्यासाठी औरंगजेबला दोषी कसे धरणार? एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना शेतकºयांना पीक विमा देणारी कंपनी हजारो कोटींचा नफा कसा काय कमावते, असे प्रश्न उपस्थित करतानाच, संदर्भहीन गोष्टींवरच चर्चेच्या फेºया झडतील, अशी व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्या, बेरोजगारीसारख्या सामान्यांच्या जगण्याच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची अथवा त्यावर तोंड लपविण्याची वेळ सरकारवर येत नसल्याचे कन्हैयाने सांगितले. लोकशाही मूल्ये मजबूत असायला हवीत, पण दिवसेंदिवस ती संकटात येत आहेत. सत्तेच्या वर्तुळातील मंडळींचे माध्यमांमध्ये आर्थिक लागेबांधे तयार झाले आहेत. त्यामुळेच लोकशाही आणि पत्रकारितेची मूल्ये धोक्यात आल्याचा आरोपही कन्हैयाने केला.
सरकारमुळे लोकशाहीच संकटात
भाजपाविरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, असे सांगतानाच, आपण कोणत्याही एका पक्षाच्या विरोधात अथवा बाजूचे नसल्याचा दावाही कन्हैयाने केला. भाजपा सरकार ज्या पद्धतीने काम करते आहे, त्यामुळे लोकशाहीच संकटात सापडली आहे. त्यामुळेच त्यांना विरोध करण्याची भूमिका स्वीकारल्याचेही कन्हैयाने स्पष्ट केले.