सरकारने प्लॅस्टिक बंदीतून पाण्याच्या बाटल्यांना वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 06:18 AM2018-04-13T06:18:23+5:302018-04-13T06:18:23+5:30
प्लॅस्टिक बंदी होऊन १२ दिवस होत नाहीत तोच निर्णयात पहिला बदल करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्यासह अन्य वापरासाठीच्या पीईटी बाटल्यांना या बंदीतून मुक्त करण्याची राजपत्रित अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे.
मुंबई : प्लॅस्टिक बंदी होऊन १२ दिवस होत नाहीत तोच निर्णयात पहिला बदल करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्यासह अन्य वापरासाठीच्या पीईटी बाटल्यांना या बंदीतून मुक्त करण्याची राजपत्रित अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. राज्यभरात १ एप्रिलपासून प्लास्टिक व थर्माकोल बंदी केली. प्लास्टिकच्या बाटल्यांचाही त्यात समावेश होता. पीईटी व पीईटीई प्रकारच्या कच्च्या मालापासून या बाटल्या बनविलेल्या असतात. पाणी, खाद्यतेल, सरबते यांच्या साठवणुकीसाठी यांचा उपयोग होतो. अटींच्या आधारे
राज्य सरकारने बाटल्यांवरील बंदी मागे घेतली.
बाटल्यांना बंदीतून मुक्त करण्यासंबंधी महाराष्टÑ खाद्यतेल व्यापारी महासंघाने विषय उचलला होता. महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पीईटी बाटल्यांचा पुनर्वापर शक्य असतो. या बाटल्यांचा मोठा उपयोग खाद्यतेलासाठी होतो. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बंदीमुळे खाद्यतेल साठवणूक कठीण होईल, हे त्यांनाही पटले. त्यानंतर ही बंदी मागे घेण्यात आली आहे. ती घेताना लावलेल्या अटींची पूर्तता तीन महिन्यांत करायची आहे. त्यासाठी आता प्रयत्न केला जाईल. ज्या प्लास्टिकवर राज्यात बंदी आणली आहे, त्याचा व्यवसाय वार्षिक ५ हजार कोटींचा आहे. त्यापैकी २२ ते २५ टक्के व्यावसाय हा पीईटी बाटल्यांचा आहे. या निर्णयामुळे आता १,००० ते १२०० कोटी रुपयांच्या व्यावसायाला संजीवनी मिळाली.
>अशा आहेत अटी
प्रत्येक बाटलीला रद्दीप्रमाणे वापरानंतर किंमत मिळायला हवी, ही किंमत बाटलीवर नमूद असावी
ग्राहकाने बाटली आणून दिल्यास दुकानदाराने त्याची पुनर्खरेदी करणे बंधनकारक
१ लीटरसाठी १ व त्यावरील बाटलीसाठी २ रुपये दर
बाटलीच्या पुनर्वापरासाठी सार्वजनिक ठिकाणी जागोजागी ‘व्हेंडिंग मशीन्स’ उभ्या करा. उत्पादक व बाटलीचा वापर करणाऱ्या उत्पादकांनी मशीन्स उभ्या कराव्यात