मुंबई - शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यावर उद्धव ठाकरे यांनी काल अखेर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याबरोबरच अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार पडले. ठाकरे सरकार पडल्यानंतर आता भाजपाने सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या घडामोडींदरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उतायचं नाही, मातायचं नाही, जनतेचं काम करायचं. अडीच वर्षांनंतर स्थापन होणारं सरकार २५ वर्षे टिकेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काल दिवसभरात घडलेल्या अनेक घडामोडी आणि कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर रात्री सुप्रिम कोर्टाने बहुमत चाचणी नियोजित वेळेनुसार घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यातील जनतेला संबोधित करत उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पराभव झाला म्हणून आपण उन्माद करायचा नाही, असा सल्ला भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले की, अडीच वर्षांनंतर स्थापन होणारं सरकार २५ वर्षे टिकेल. या संपूर्ण लढाईत भाजपाच्या आमदारांची भूमिका महत्त्वाची होती. तसेच या संपूर्ण घटनाक्रमात निर्णायक भूमिका घेणाऱ्या शिंदे गटातील आमदारांचेही मी आभार मानतो.
आता शपथ घेऊ आणि नंतर जल्लोष करू. येणाऱ्या काळात आपण एक स्थिर सरकार देऊ. आता उतायचं नाही. मातायचं नाही. जनतेचं काम करायचं, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे आमदार आणि कार्यकर्त्यांना दिला. तसेच आपण सगळ्यांनी टिम म्हणून काम केल्याबद्दल धन्यवाद, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले.
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला विजय मिळाला होता. पण शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरत युती मोडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्याने ८० तासांचं सरकार स्थापन केलं, पण पुढच्या नाट्यमय घडामोडींनंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.