शासकीय गोदामात स्वस्त धान्य पडून
By admin | Published: November 4, 2014 12:32 AM2014-11-04T00:32:54+5:302014-11-04T00:32:54+5:30
शासकीय गोदामात २० हजार क्विंटल धान्य पडून आहे. जोपर्यंत आमच्याशी चर्चा होऊन न्याय मिळत नाही,
कळंबोली : बनावट तक्रारदारांच्या आधारे राज्य भरारी पथकाने टाकलेल्या बेकायदा धाडी, त्याचबरोबर दुकानदारांवर पुरावे नसताना दाखल केलेले गुन्हे याबाबत निषेध नोंदवत पनवेल तालुक्यातील धान्य दुकानदारांनी धान्य उचलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शासकीय गोदामात २० हजार क्विंटल धान्य पडून आहे. जोपर्यंत आमच्याशी चर्चा होऊन न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा रास्तभाव धान्य दुकान वेल्फेअर असोसिएशनने दिला आहे.
पनवेल तालुक्यात एकूण १८८ पैकी १८२ महसूल गावांमध्ये प्रशासनाने दुकाने सुरू केलेली आहेत. गरिबातल्या गरिबाला अन्न मिळावे याकरिता अन्नसुरक्षा योजना अमलात आणली. पनवेलमध्ये या योजनेत बसणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ६० हजारांपेक्षा अधिक आहे.
असोसिएशनच्या नुकताच काळण समाज हॉलमध्ये झालेल्या सभेत भरारी पथकाच्या कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला. स्वस्त धान्य चालवणे महाग झाले असताना पुरवठा विभागाकडून खोट्या आणि बनावट तक्रारीद्वारे दुकानदारांना वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष भरत पाटील यांनी केला आहे.
राज्य भरारी पथकाने अजय दत्तात्रय देशमुख या बनावट तक्रारदाराच्या तक्रारीची कोणतीही छाननी न करता दुकानदारांवर धाडी टाकल्या. संबंधीत दुकानदारांकडे कोणत्याही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या नाहीत. त्यांनी धान्याचे अपहार केल्याचा कोणताही पुरावा नसतानाही गुन्हे दाखल केल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)