मुंबई : मुंबईचे महापौर निवासस्थानाच्या प्रतीक्षेत असताना, सनदी अधिकारी बदलीनंतरही महापालिकेच्या मलबार हिलयेथील बंगल्यात वास्तव्य करीत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ही जागा तत्काळ रिकामी करून घेण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेने प्रशासनावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे, तर विरोधी पक्षाच्या मागणीनुसार हा विषय गटनेत्यांच्या बैठकीत चर्चेसाठी मांडण्यात आला आहे.पालिकेच्या जल विभागाच्या अखत्यारित असलेला हा बंगला डिसेंबर २०१४ मध्ये तत्कालीन अतिरिक्त पालिका आयुक्त पल्लवी दराडे यांना राहण्यास देण्यात आला. तेव्हापासून त्यांचे पती सनदी अधिकारी प्रवीण दराडे व त्या या बंगल्यात राहात आहेत.दादर, शिवाजी पार्क येथील महापौरांचे निवासस्थान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेयांच्या स्मारकासाठी दिल्याने, महापौरांच्या निवासस्थानाचाशोध सुरू आहे. मात्र, राणी बागेतील बंगला नाकारून विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मलबार हिल येथील या बंगल्याची मागणी केली होती. हा बंगला महापालिकेचा असल्याने, सनदी अधिकाºयाच्या बदलीनंतर त्याचा ताबा महापालिकेकडे परत येणे अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी हा बंगला परत घेण्याची मागणी लावून धरली आहे. बदलीनंतरही सनदी अधिकाºयाला या बंगल्यात राहायला देऊन चुकीचा पायंडापाडू नये, अशी सूचना विरोधकांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याने, दराडे दाम्पत्यांना हा बंगला वास्तव्यास मिळाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, गटनेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
महापालिकेच्या बंगल्यात सरकारी पाहुणे; मागणीनंतर विषय गटनेत्यांच्या बैठकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 6:37 AM