गुजरात पीडितांचे सरकारला साकडे
By admin | Published: April 20, 2017 04:43 AM2017-04-20T04:43:29+5:302017-04-20T04:43:29+5:30
गुजरातच्या वडावली गावात १४२ घरे सशस्त्र हल्ला करून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे
मुंबई : गुजरातच्या वडावली गावात १४२ घरे सशस्त्र हल्ला करून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, शेजारच्या चार गावांतील गावकऱ्यांनीच ही लूट केली असून, हल्ल्यात अॅसिडसह बंदुकीचा वापरही केल्याचे समजते.
या हल्ल्यात इब्राहिम बेलिम या गावकऱ्याचा मृत्यू झाला असून, गावचे सरपंचही गोळी लागल्याने गंभीर आहेत. दहशतीमुळे न्याय मिळत नसल्याने, गावातील पीडित कुटुंबीयांनी बुधवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत, न्यायासाठी गुजरात सरकारसह जिल्हा प्रशासनाला साकडे घातले आहे.
हा पूर्व नियोजित हल्ला असल्याचा संशय इम्रान कुरेशी या स्थानिक नागरिकाने व्यक्त केला आहे. कुरेशी म्हणाले की, ‘पोलिसांनी गुन्हा नोंद केला असला, तरी प्रशासन या संदर्भात गंभीर नाही. अद्याप पीडितांना कोणतीही मदत झाली नसून, जमात ए उलेमा ए हिंद या संस्थेकडून गावकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. मात्र, ती मदत तोकडी पडत असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतरही अद्याप कोणतीही मदत मिळाली नसून, उलट प्रकरण दाबण्याचा प्रकार होत आहे,’ असा आरोप कुरेशी यांनी केला आहे.