नोटाबंदी, जीएसटीमधून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून जनतेच्या खिशात हात - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 07:03 PM2018-09-10T19:03:37+5:302018-09-10T19:18:30+5:30
नोटाबंदी आणि जीएसटीमधून झालेले नुकसान भरून काढण्यासाठीच केंद्र सरकारने आता पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून लोकांच्या खिशात हात घातला आहे.
मुंबई - नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाला खड्ड्यात घालण्याचे काम केले आहे. मोदी सरकारने केलेली नोटाबंदी फसली, लागू केलेला जीएसटी फसला. त्यातून झालेले नुकसान भरून काढण्यासाठीच यांनी आता पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून लोकांच्या खिशात हात घातला आहे, अशी टीका मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली.
#BharatBandh : इंधनाचे दर कमी करणं सरकारच्या हातात नाही असं रविशंकर प्रसाद म्हणतात... मग काँग्रेस सरकारविरोधात भारत बंद का पुकारला होतात?: @mnsadhikrut अध्यक्ष राज ठाकरे
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) September 10, 2018
काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदलामनसेने पाठिंबा जाहीर केला होता. तसेच बंद यशस्वी करण्यासाठी मनसैनिक रस्त्यांवर उतरले होते. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज ठाकरे यांनी यावेळी केंद्रातील सत्तेवर असलेले भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. "इंधनाचे दर कमी करणं सरकारच्या हातात नाही असे रविशंकर प्रसाद म्हणतात, मग काँग्रेस सरकारविरोधात भारत बंद का पुकारला होतात?" असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
#BharatBandh : देशाचा प्रमुख हा राजा असावा, व्यापारी नसावा, नोटाबंदी फसली म्हणून जनतेच्या खिशात हातः @mnsadhikrut अध्यक्ष राज ठाकरे
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) September 10, 2018
"भाजपा सरकारच्या काळात पेट्रोल डिझेलच्या भावांनी उच्चांक गाठलाय, तर डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाला खड्ड्यात घालण्याचे काम केले आहे. मोदी सरकारने केलेली नोटाबंदी फसली, लागू केलेला जीएसटी फसला. त्यातून झालेले नुकसान भरून काढण्यासाठीच यांनी आता पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून लोकांच्या खिशात हात घातला आहे." असे राज ठाकरे म्हणाले.