Jayant Patil ( Marathi News ) : राज्यात येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार असून सर्वक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचे दौरेही वाढले आहेत. दरम्यान, 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाची 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू आहे. काल ही यात्रा बारामती होती, यावेळी सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला. बारामती येथे पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारवर आरोप केले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, फारसा विचार न करता त्यांनी ही योजना जाहीर केली, आता जास्तीत जास्त पैसे वाटप करण्याचे धोरण सरकारने अनुसरले आहे. हे तात्पुरतं धोरण आहे, त्याला योग्य लॉगटर्म धोरण करुन महिला भगिनींना व्यवस्थितपणे पैसे देण्याचे काम केले पाहिजे, ते या सरकारला करता येत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या अटी शर्ती करण्याचे काम करत आहेत, आता यातले काहीच करता येत नाही म्हणून जिल्हास्थरावर हे निर्णय दिले आहेत.निवडणुकीपर्यंतच हे पैसे वाटायचे अशी माणसिकता यांची आहे, असा आरोपही जयंत पाटील केला.
"आमचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगलं स्वरुप द्यावे लागेल, असंही पाटील म्हणाले.
सरकार जाणार हे काळ्या दगडावरची रेघ
'सरकार जाणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे, म्हणून हे कोणतीही घोषणा करत आहेत. यांच्यावर आता लोकांचा विश्वास नाही, शेतकऱ्यांनी आता पक्क ओळखलं आहे. यांची आश्वासनं फक्त तात्पुरती आहेत, असा टोला जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर लगावला.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने निर्णय घ्यावा
'राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिले आहे. राज्य सरकारने या आश्वासनावर निर्णय घेतला पाहिजे, नवी मुंबईत मुख्यमंत्री जरांगे पाटील यांना भेटले होते. यावेळी काय ठरले? कोणती आश्वासने दिली, यावर निर्णय घेतला पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.
'दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न'
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर काही दिवसापूर्वी हल्ला झाला. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, असा भ्याड हल्ला करुन राजकीय नेत्यांना महाराष्ट्रात फिरुण्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का? या हल्ल्याबाबत लोकांनी पोलिसांना माहिती दिली होती. तरीही पोलिसांनी आवश्यक ती काळजी घेतली नाही, याचा अर्थ पोलिस या गुंडाला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.