मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात नागपाडा येथील आंदोलन मागे घ्यायचे की चालू ठेवायचे हा निर्णय घेण्याचा अधिकार आंदोलक महिलांचाच आहे. रस्त्यावर एक जरी आंदोलक महिला असेल तरी तिचे म्हणणे सरकारला ऐकून घ्यावेच लागेल, असे महात्मा गांधी यांचे नातू आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी सांगितले.
२६ जानेवारीपासून सुरू असलेल्या आंदोलनात फूट पडली आहे. एका गटाने आंदोलन चालूच ठेवले आहे. या आंदोलनात तुषार गांधी यांनी गुरुवारी सहभाग नोंदवत पाठिंबा दिला. दरम्यान, आंदोलक महिलांशी यापूर्वीच चर्चा केली असून आंदोलन लवकरच मागे घेण्यात येईल, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.
पोलिसांकडून छायाचित्रकाराला मारहाण
आंदोलनाच्या वार्तांकनासाठी गेलेल्या इंग्रजी दैनिकाच्या छायाचित्रकाराला पोलिसांनी धक्काबुकी करत माराहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. छायाचित्रकार आशीष राजे, सतीश माळवदे यांना पोलिसांनी आत सोडण्यास नकार दिला. राजे ओळखपत्र दाखवत असताना, दोघांनी धक्काबुकी करत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एकाने कानाखाली मारून काठी उगारल्याचा आरोप राजे यांनी केला.
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विट करताच तो व्हायरल झाला. मुंबईतील सर्व पत्रकार संघटनांनी याचा निषेध केला. मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली असता त्यांनी संबंधित पोलिसांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.