मुंबई : कोरेगाव-भीमा प्रकरणातील कथित आरोपी संभाजी भिडेंना अद्याप अटक का केलेली नाही, असा प्रश्न भारिपच्या प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. भिडेंच्या अटकेसाठी काढण्यात येणा-या मोर्चाला परवानगी नाकारून सरकारनं लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ते मुंबईतल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.सरकारनं एल्गार मोर्चासाठी परवानगी दिली नसली तरी उद्या मोर्चा निघणारच, असा निर्धारही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवला. कोरेगाव-भीमा प्रकरणात ज्यांच्यावर अन्याय सहन करण्याची वेळी आली त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारली. तर दुसरीकडे हिंसाचार घडवणारे मोकाट आहेत. सरकारचा सैतानाला पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. संभाजी भिडे यांना अटक करावी यासाठी उद्या सोमवारी प्रकाश आंबेडकर हे मुंबईत मोर्चा काढणार आहे. मुंबईतल्या राणीच्या बागेपासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. परंतु पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तरीही आंबेडकरांनी हा मोर्चा निघणार असल्याचं बोलून दाखवलं आहे. मोर्चासाठी महाराष्ट्रभरातून जनता निघाली असून, त्यांना आता कोणीही रोखू शकणार नाही, असंही आंबेडकर म्हणाले आहेत.
मोर्चाला परवानगी नाकारून सरकारनं लोकशाहीचा गळा घोटला- प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 6:56 PM