शासकीय रुग्णालय चित्रीकरणासाठी देऊ नये! १९ वर्षांपूर्वी तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिल्या होत्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 10:03 AM2024-03-13T10:03:53+5:302024-03-13T10:06:01+5:30
जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण विभागाने चित्रीकरणासाठी परवानगी दिल्यानंतर नागरिक आणि डॉक्टरांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
संतोष आंधळे, मुंबई :जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण विभागाने चित्रीकरणासाठी परवानगी दिल्यानंतर नागरिक आणि डॉक्टरांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. २००४ मध्ये ‘बंटी और बबली’ या हिंदी चित्रपटासाठी सेंट जॉर्जेस रुग्णालयात चित्रीकरण करण्यात आले होते. त्यावेळी रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. वैद्यकीय शिक्षण विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमली होती. त्यावेळी समितीने रुग्णालये ही रुग्णांसाठी असून, चित्रीकरणामुळे रुग्णसेवेत बाधा निर्माण होतात, असा अहवाल दिला होता. तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री सुरेश शेट्टी यांनी शासकीय रुग्णालय चित्रीकरणासाठी देऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या.
२००४ मध्ये ‘बंटी और बबली’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी उपचारासाठी दाखल असलेल्या काही रुग्णांना वॉर्डमधून व्हरांड्यामध्ये हलविण्यात आले होते. त्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. चित्रीकरणासाठी रुग्णालयाचा परिसर देण्याच्या मुद्द्यावरून त्यावेळी शासनावर टीकाही झाली होती. या घटनेनंतर त्यावेळचे वैद्यकीय शिक्षणमंत्री सुरेश शेट्टी यांनी याप्रकरणी त्यावेळचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमली होती. या समितीने त्यावेळी सर्व घटनेचा अभ्यास करून शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेला बाधा पोहोचण्याची शक्यता असते, त्यामुळे शासकीय रुग्णालयात चित्रीकरणासाठी परवानगी देऊ नये, असा अहवाल समितीने सादर केला होता. ११ जून २००५ मध्ये शेट्टी यांनी शासकीय रुग्णालय चित्रीकरणासाठी देऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. दरम्यान, रुग्णांना त्रास होत असेल तर आपण चित्रीकरण बंद करण्याचे आदेश देऊ, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
चित्रीकरणास मंगळवारी सुरुवात झाली असून बॉईज कॉमन रूमला महानगर न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय बोरिवली, मुंबई असा फलक लावण्यात आला आहे.
ज्यावेळी हे प्रकरण चौकशीसाठी आले होते. आमच्या समितीत आणखी दोन डॉक्टर होते. त्यावेळी आम्ही अशी भूमिका घेतली होती की, शासकीय रुग्णालयात काय रुग्णांची गर्दी असते. यामुळे रुग्णसेवेला बाधा निर्माण होते. शासकीय रुग्णालय चित्रीकरणासाठी देऊ नये. आरोग्याशी निगडीत रुग्णांच्या फायद्यासाठी जाहिरात, डॉक्युमेंट्री असेल तर विचार करण्यास हरकत नाही. मात्र, चित्रपटांना चित्रीकरणामुळे खूप बंधने येतात, त्याचा रुग्णांना त्रास होऊ शकतो. - डॉ. सुभाष साळुंखे, तत्कालीन महासंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग
१) सोमवारपासून जे. जे. रुग्णालयाच्या परिसरात सेंट्रल कॅन्टीन शेजारी असणाऱ्या बॉईज कॉमन रूम येथे चित्रीकरणाची तयारी सुरू करण्यात आली होती. मंगळवारी चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. त्या ठिकाणी सध्या कोर्टाचा सेट उभारण्यात आला आहे.
२) सार्वजनिक बांधकाम विभागाने शुल्कसुद्धा आकारले आहे. त्यामुळे रुग्णांनी गजबजलेल्या शासकीय रुग्णालय परिसरात चित्रीकरणास परवानगी देणे योग्य की अयोग्य, यावरून वाद सुरू झाला आहे.