सरकारी रुग्णालये होणार चकाचक; मशीनद्वारे स्वच्छता, ५ वर्षांसाठी ६३८ कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 06:34 AM2023-09-22T06:34:25+5:302023-09-22T06:34:48+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत राज्यभरात १९०० हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ५०० हून अधिक लहान-मोठी रुग्णालये आहेत.
मुंबई : शासकीय रुग्णालये म्हणजे पोपडे उडालेल्या भिंती, घाणेरडा आणि उदासीन परिसर, कमालीचा अस्वच्छपणा, गोंधळाचे आगर असे सर्वसाधारण चित्र असते. मात्र, आता हे चित्र पुसून टाकण्याचा निर्धार आरोग्य विभागाने केला असून, आपल्या अखत्यारित येणाऱ्या अडीच हजार आरोग्य केंद्रे व रुग्णालयांत मशीनद्वारे स्वच्छता करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच राबवली जाणार असून पाच वर्षांसाठी ६३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत राज्यभरात १९०० हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ५०० हून अधिक लहान-मोठी रुग्णालये आहेत. या ठिकाणी कमालीची अस्वच्छता पाहायला मिळते. बहुतांश पायऱ्यांवरचे कोपरे आणि भिंती या पानाच्या पिचकाऱ्यांनी लाल झालेल्या असतात.
स्वच्छता सेवा उपलब्ध
या खर्चात मशीनने स्वच्छता, सर्व प्रकारचे डिटर्जंट तसेच निर्जंतुकीकरणाकरिता लागणारे साहित्य, कर्मचारी,मशीन व इतर साहित्याचा समावेश राहील. ज्या रुग्णालयांमध्ये नियमित सफाईगार कर्मचारी कार्यरत आहेत. नियमित सफाईगार कर्मचाऱ्यांची संख्या विचारात घेऊन त्यानुसार स्वच्छता सेवा उपलब्ध करणार असून पुरवठादारास स्वच्छतेसाठी लागणारे डिटर्जंट गरजेएवढी संख्या रुग्णालयात आणून ठेवणे बंधनकारक असेल.
आपल्याकडे १९०० पेक्षा अधिक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ५०० पेक्षा लहान आणि मोठी रुग्णालये आहेत. त्या ठिकाणी यापूर्वी स्वच्छता प्रचलित पद्धतीने होत होती. मात्र यामध्ये बदल होणे गरजेचे होते. काही ठिकाणी स्वच्छ्तेच्या मुद्द्यावरून तक्रारी येत होत्या. त्यामुळे आता पुढच्या पाच वर्षांकरिता या ठिकाणी मशीनद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे. या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याने निविदा प्रक्रिया राबविणार आहोत. - धीरज कुमार, आयुक्त, आरोग्य सेवा