दवाखाने बंद ठेवण्यावरून सरकार आयएमए आमने-सामने; डॉक्टरांवरील कारवाई रोखा, बंद दवाखाने दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 01:17 AM2020-03-31T01:17:12+5:302020-03-31T06:39:49+5:30

६५ वर्षांवरील डॉक्टरांना कायद्यातून वगळण्याची मागणी

Government IMAs face to face with closure of hospitals | दवाखाने बंद ठेवण्यावरून सरकार आयएमए आमने-सामने; डॉक्टरांवरील कारवाई रोखा, बंद दवाखाने दाखवा

दवाखाने बंद ठेवण्यावरून सरकार आयएमए आमने-सामने; डॉक्टरांवरील कारवाई रोखा, बंद दवाखाने दाखवा

Next

- यदु जोशी

मुंबई : अनेक डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने,ओपीडी बंद केले आहेत या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या वक्तव्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून दवाखाने बंद केल्याच्या नावाखाली राज्यभरात डॉक्टरांना नोटिसेस पाठवण्याची शासनाने हाती घेतलेली मोहीम तत्काळ थांबवावी अशी मागणी केली आहे.

तुम्ही दवाखाना बंद ठेवला असेल तर महामारी कायदा १८९७ च्या अंतर्गत दंड ठोठावण्यात येईल तसेच प्रसंगी मेडिकल कौन्सिलकडे असलेली तुमची नोंदणीही रद्द करण्यात येईल अशा आशयाच्या नोटिसेस सर्व 36 जिल्ह्यांमधील डॉक्टरांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात येत आहेत.

दवाखाने ओपीडी यांना संचारबंदी तून वगळण्यात आले आहे या अत्यावश्यक सेवा आहे त्यामुळे डॉक्टरांनी ही सेवा सुरू ठेवली पाहिजे आजच्या परिस्थितीत डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवण्याची अपेक्षा नाही असे विधान आरोग्य मंत्री टोपे यांनी केले होते. त्यावर, दवाखाने सुरू ठेवण्याबाबत येत असलेल्या अडचणींविषयी सरकार काही उपाययोजना करणार की डॉक्टरांविरुद्ध कारवाई करणार असा सवाल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सोमवारी लोकमत'शी बोलताना केला. सरकारने आयएमएला बंद दवाखाने दाखवले तर आम्ही संबंधित डॉक्टरशी तत्काळ बोलू आणि त्यांना दवाखाना सुरू करायला सांगू असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉक्टरांनी विनाकारण कुठेही दवाखाने बंद ठेवलेले नाहीत.ते आपल्या कर्तव्यापासून दूर गेलेले नाहीत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेली परिस्थिती त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक बनली असून प्रॅक्टिस करण्यापासून काही घटक त्यांना रोखत आहेत असा आरोप भोंडवे यांनी केला आहे. तसे पत्र त्यांनी मंत्री राजेश टोपे यांना पाठवले आहे.

डॉ.भोंडवे यांनी लोकमतला सांगितले की, अनेक डॉक्टरांनी दवाखाने बंद केले असल्याचा आरोप करण्याच्या आधी या डॉक्टरांना सामाजिक आणि वैद्यकीय संरक्षण आहे काय याचा विचार सरकारने करायला हवा होता. डॉक्टर आपल्या कर्तव्यापासून दूर जात आहेत असा सरसकट गैरसमज तयार केलाजात आहे ते योग्य नाही. अनेक हाऊसिंग सोसायटी, मोहल्ल्यांमध्ये डॉक्टरांना प्रॅक्टिस करण्यापासून रोखले जात आहे. दवाखाने बंद ठेवण्याची जबरदस्ती केली जात आहे.जे डॉक्टर्स क्लिनिक सुरू ठेवू इच्छितात त्यांना सरकारने संरक्षण द्यायला हवे.

दवाखाने, हॉस्पिटल्समधील कर्मचारी कामावर जात असताना पोलिस त्यांना विनाकारण अडवत आहेत. त्यांचे आयकार्ड बघण्याच्या आधीच त्यांना मारहाण केली जात आहे.त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.त्यांचे कुटुंबीयदेखील कोरोनाच्या सावटामुळे त्यांना कामावर जाऊ देत नाही. त्यामुळे दवाखाने, हॉस्पिटल चालवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत याकडेही आयएमएने लक्ष वेधले आहे.

६५ वर्षे वयावरील व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. जगात ज्या केसेस समोर आलेल्या आहेत त्यांच्यात ६५ वर्षे वयावरील व्यक्तींना कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यातही ज्या व्यक्तींना रक्तदाब, मधुमेह, कर्करोग आहे त्यांना लागण होण्याचा धोका अधिक असतो. म्हणून सध्या अशा वयोवृद्ध डॉक्टरांना प्रॅक्टिस न करण्याची मुभा देण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू नये अशी मागणी आयएमए केली.

Web Title: Government IMAs face to face with closure of hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.