Join us

समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यावर सरकार ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 6:21 AM

ठाकरे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला.

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामागार्चे काम करताना उद्योगांचे टापू निर्माण करून त्यांना त्याभागातच सर्व सुविधा पुरविल्या जाव्यात असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. आर्थिक संकटाच्या काळातही हा महामार्ग पूर्ण करण्यावर सरकार ठाम असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे.

ठाकरे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या निमित्ताने एक बाब लक्षात आली ती म्हणजे ज्या भागात उद्योगाचा पट्टा आहे तेथे लोकसंख्येची घनता जास्त आहे. याच पट्ट्यात लॉकडाऊन करावे लागत आहे. त्यामुळे राज्यात नविन उद्योग आणताना त्याचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे. समृद्धी महामागार्ची उभारणी करताना ही बाब लक्षात घेतली जाईल. २४ जिल्ह्यांना जोडणारा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे म्हणाले, ७०१ कि.मी. लांबीच्या महामागार्साठी ८३११.१५ हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे. यावेळी मोपलवार यांनी सादरीकरण केले.

टॅग्स :मुंबई