Join us

"फ्लेमिंगो" चा नैसर्गिक अधिवास व सुरक्षिततेबाबत सरकार सकारात्मक, सुधीर मुनगंटीवार यांनी दिली माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 7:39 PM

Sudhir Mungantiwar News: हजारो किलोमीटर प्रवास करून, इराण, मध्य पूर्व आशिया आणि विविध देशांच्या सीमा ओलांडत फ्लेमिंगो (Flamingo) पक्षी भारतात येतात. या पक्षांच्या सुरक्षिततेचा व त्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित करण्यासाठी सरकार सकारात्मक असून यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली.

मुंबई -  हजारो किलोमीटर प्रवास करून, इराण, मध्य पूर्व आशिया आणि विविध देशांच्या सीमा ओलांडत फ्लेमिंगो पक्षी भारतात येतात. या पक्षांच्या सुरक्षिततेचा व त्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित करण्यासाठी सरकार सकारात्मक असून यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली. ही समिती दोन महिन्यात अहवाल सादर करेल असा निर्णय त्यांनी जाहीर केला. विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात फ्लेमिंगो च्या मृत्यू संदर्भात उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. विधानसभा सदस्य चेतन तुपे यांनी संदर्भात प्रश्न उपस्थित करताना, सुधीर मुनगंटीवार हे वन्यजीवांच्या कुठलाही प्रश्न आला तर तळमळीने बोलतात व संवेदनशील पणे प्रश्न हाताळतात असे सभागृहात सांगितले.

 आज घोषित करण्यात आलेल्या समितीमध्ये प्रधान सचिव वने, बॉम्बे नॅचरल हाय सोसायटीचे प्रवीण परदेशी, सिडको चे व्यवस्थापक, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, प्रधान सचिव पर्यावरण, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, जिल्हाधिकारी ठाणे, प्रधान सचिव नगर विकास, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक कांदळवन हे सदस्य असतील.

पुणे जिल्ह्यातील मुळा मुठा तालुक्यात मांजरी परिसरात नैसर्गिक पानवठे असून त्या ठिकाणी पूर्वी फ्लेमिंगो येत होते, परंतु आता वाढत्या शहरीकरणामुळे अधिवास धोक्यात आला आहे, असा प्रश्न आमदार तुपे यांनी उपस्थित केला. यावर मुनगंटीवार म्हणाले, तेथे त्यांचा अधिवास सुरक्षित करण्याच्या दृष्टीने वनविभाग तपासून निश्चित कार्यवाही करेल. सहा फ्लेमिंगो मृत झाल्याप्रकरणाची सविस्तर माहिती  मुनगंटीवार यांनी सभागृहात देत मृत पक्ष्यांचा शिवविच्छेदन अहवाल व मृत्यूची कारणे यासंदर्भात या संदर्भातील शंकांचे निरसन व्हावे व दूषित पाणी की प्रदूषण यामुळे मृत्यू झाला याची शहनिशा व कारणे समितीच्या अहवालातून येतील अशी खात्री यावेळी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अधिक माहिती देत सुधीर मुनगंटीवार सविस्तर बोलताना म्हणाले की, 2017 पासून मुंबई ठाणे परिसरात अधिवास उत्तम असल्याने फ्लेमिंगोंची संख्या वाढली. या भागात इराण, कच्छ, मध्य पूर्व आशिया या भागातून फ्लेमिंगो येतात. फ्लेमिंगो मृत्यू बाबत ते म्हणाले, नेरूळ भागातील डीपीएस लेकमध्ये येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने व इनलेट बंद झाले;  परंतु तेथील पाणी गुलाबी का झाले याबाबत स्पष्टता आली नाही; परंतु पाण्याचा प्रतिकूल परिणाम झाला का याबाबतदेखील स्पष्टता नसल्याचे सांगत चार फ्लेमिंगोंचा मृत्यू हृदय आणि फुफुसांच्या आजारामुळे झाला, तर दोन फ्लेमिंगों छिन्नविछिन्नावस्थेत आढळल्याने शवविच्छेदन करता आले नाही अशी माहिती सभागृहात दिली.  

टॅग्स :सुधीर मुनगंटीवारविधानसभावन्यजीव