Join us

शासकीय आयटीआयला अच्छे दिन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2016 4:03 AM

गेल्या चार वर्षांत प्रथमच शासकीय आयटीआयमधील प्रवेश ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. यंदा १०० टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आयटीआयला पसंती

मुंबई : गेल्या चार वर्षांत प्रथमच शासकीय आयटीआयमधील प्रवेश ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. यंदा १०० टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आयटीआयला पसंती दिल्याचे निदर्शनास येते. शिवाय कौशल्य विकासमधून मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी पाहता विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आयटीआयमध्ये प्रवेश घेतल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याआधी आयटीआय प्रवेशासाठी एकूण ३ लाख २१ हजार ७०१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील १ लाख ८३ हजार ३४५ विद्यार्थ्यांना शासकीय आयटीआयमधील जागांवर प्रवेशाची संधी देण्यात आली. यांमधील एकूण ८५ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. तर खासगी आयटीआयमधील जागांसाठी ४१ हजार ८४३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यामधील केवळ २० हजार ९१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. अशा प्रकारे आयटीआयच्या चार फेऱ्यांसह समुपदेशक फेरी आणि आयटीआय स्तरावरील फेरीनंतर एकूण १ लाख ६ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता, त्यांच्यापैकी शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९१.७२ टक्के आहे. तर खासगी आयटीआयमध्ये केवळ ५२.६१ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. राज्यातील एकूण १ लाख ३३ हजार ३९३ जागांसाठी आतापर्यंत २ लाख २५ हजार १८८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. मात्र त्यापैकी एकूण १ लाख ६ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी म्हणजेच ८०.०६ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. (प्रतिनिधी)एका जागेसाठी दोन अर्ज... आयटीआयच्या एकूण जागांसाठी राज्यातून ३ लाख २१ हजार ७०१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. अशा प्रकारे आयटीआयच्या सरासरी एका जागेसाठी २.४१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. एकीकडे पॉलिटेक्निक प्रवेशाच्या उपलब्ध जागांपैकी निम्म्या जागांसाठीही अर्ज आले नव्हते. याउलट आयटीआयच्या उपलब्ध जागांहून दुप्पट अर्ज आले आहेत. त्यामुळे पॉलिटेक्निककडे पाठ फिरवलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने आयटीआयकडे वळल्याचे दिसत आहे.