शासकीय आयटीआयला बळकटी मिळणार; ६० हजार जागांची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 02:13 AM2019-01-01T02:13:38+5:302019-01-01T02:14:01+5:30
आयटीआयला अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. राज्यभरात आयटीआयच्या १ लाख ३८ हजार ३१७ जागा आहेत.
- सीमा महांगडे
मुंबई : आयटीआयला अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. राज्यभरात आयटीआयच्या १ लाख ३८ हजार ३१७ जागा आहेत. त्यापैकी शासकीय आयटीआयमध्ये ९४,२४८, तर खासगी आयटीआयमध्ये ४४,०६९ जागा आहेत. यंदा आयटीआयसाठी आलेल्या अर्जांची संख्या ३ लाख ३० हजार ३३२ होती. त्यामुळे अनेकांना प्रवेशाविना राहावे लागले. मात्र आयटीआयच्या बळकटीकरणासाठी एक प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुसार राज्यातील शासकीय आयटीआयची क्षमता
तब्ब्ल ६० हजार जागांनी वाढणार
आहे.
विशेष म्हणजे शासकीय आयटीआय संस्थांची क्षमता वाढवताना आस्थापना खर्च होणार नसून जुने अभ्यासक्रम बदलण्यात येतील. आयटीआय शिफ्ट्स जास्तीत जास्त चालू ठेवता येतील, असा प्रयत्न केला जाईल. तसेच अभ्यासक्रमाप्रमाणे मशिनरीही अद्ययावत करण्यात येईल.
सध्याच्या घडीला रोबोटिक्स, मेट्रोनिक्स, मायनिंग, लिफ्ट्स अॅण्ड एस्केलेटर्स, मेडिकल इलेकट्रोनिक्स, इंटरनेट आॅफ थिंग्स, ड्रोन टेक्निशिअन, या कोर्सेसला सर्वाधिक मागणी आहे.
२०१५ साली आयटीआयला अर्ज करणाºया विद्यार्थ्यांची संख्या दोन लाख २८ हजार होती, तर २०१८ साली तीन लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता.
मागील काही वर्षात आयटीआयकडे असलेला विद्यार्थ्यांचा ओढा पाहता, सध्याच्या जागा पुरेशा नसल्याने हा प्रस्ताव विचाराधीन आहे. यामुळे कमीत कमी आणि उपलब्ध यंत्रणेत क्षमतेतही वाढ होईल आणि अधिकाधिक विद्यार्थी रोजगारभिमुख होण्यास मदत होईल.
- असीम गुप्ता, प्रधान सचिव, कौशल्य विकास विभाग