मुंबई: मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्नांसंदर्भात राज्यसभेचे सदस्य छत्रपती संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील अन्य महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली. संभाजीराजे यांनी सरकारला तीन पर्याय सुचविले आहेत. तसेच आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत समाजाच्या विकासासाठी पाच मागण्याही सरकारसमोर मांडल्या आहेत. त्यामुळे येत्या ६ जूनपूर्वी या मागण्यांवर ठोस कार्यवाही करावी, अन्यथा शिवराज्याभिषेकदिनी किल्ले रायगडावरून आंदोलनाची हाक देऊ. तेव्हा कोरोना वगैरे काही पाहणार नाही, असा इशाराही खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे.
Maratha Reservation: मराठा समाजाला दिलासा! ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; १० टक्के EWS आरक्षण
संभाजीराजे हे सध्या तौक्ते चक्रीवादळामुळं सिंधुदुर्ग किल्याच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आले होते. मात्र, समुद्र खवळलेला असल्यामुळं त्यांना किल्यावर जाता आलं नाही. समुद्र शांत झाल्यानंतर ते पाहणी करतील अशी शक्यता आहे. मात्र या दौऱ्यादरम्यान संभाजीराजे यांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे संभाजीराजे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
संभाजीराजे म्हणाले की, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. तसेच मला हेच लक्षात येत नाही की, माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यातून मार्ग काढतील
सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची तारीख ४ जून आहे. सर्वोच्च न्यायालयाने ती वाढवली आहे. त्यामुळे अहवाल द्यायची तारीख सुद्धा पुढे गेली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नक्कीच यातून मार्ग काढतील, असा विश्वास संभाजीराजेंनी यावेळी व्यक्त केला.