नवी मुंबई : शासनाने सायन - पनवेल महामार्गासाठी संपादीत केलेली जमीन १५ कोटी रूपयांना परस्पर दुसऱ्यांना विकून मुळ शेतकऱ्यांचे वारस व शासनाची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक झाली आहे. आरोपींमध्ये विजय बाबू पाटील, दलाल खिमजी मुरजी कटारिया व शहाजी बापूराव देशमुख यांचा समावेश आहे. ॉशासनाने तुर्भे मधील बाळू पाटील, महादू पाटील व अंबाजी पाटील या तिन शेतकऱ्यांची २ हेक्टर ८८ गुंठे जमीन उल्हास खोरे प्रकल्पाअंतर्गत १९६५ मध्ये संपादीत केली होती. या तिनही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे वारस अस्तीत्वात आहेत. संपादीत जमीनीपैकी १ हेक्टर १८ गुंठे जमीनीचा प्रत्यक्ष महामार्ग बनविण्यासाठी वापर करण्यात आला. उर्वरीत १ हेक्टर ७० एकर जमीन शासनाकडून पुन्हा दिली जाणार असल्याचे भासविले. यासाठी कोकण विभागा कार्यालयातील खोटी कागदपत्र सादर केली. जमीन वारसदारांच्या नावावर झाली असल्याचे भासवून त्या जमीनीची १५ कोटी रूपयांचा विक्री करण्याचा व्यवहार केला. यासाठी १ कोटी रूपये चेकद्वार स्विकारले. पण सादर केलेली कागदपत्र खोटी असल्याचे कळताच वारसांनी व सरकारी यंत्रणेने पोलिसांत धाव घेतली. आरोपींना २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
शासनाची जमीन परस्पर १५ कोटीला विकली
By admin | Published: March 18, 2017 1:59 AM