Join us  

शासकीय यंत्रणा सज्ज

By admin | Published: October 14, 2014 10:35 PM

कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र बोरकर यांनी दिली

कर्जत : कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र बोरकर यांनी दिली. ३१० मतदान केंद्रांवर २ लाख ४२ हजार ९९१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १५५० कर्मचारी तर ४३ बस, ६० जीप, मतदानाचे साहित्य व कर्मचारी त्या-त्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी उपलब्ध केल्या होत्या. मतदानाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ४२५ पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहेत. काही होमगार्डही मदतीला आहेत. कर्जत निवडणूक विभागाचे कार्यालय दहिवली अभियांत्रिकी महाविद्यालयात असून आज सर्व मतदान केंद्रांसाठी मतदान यंत्रे तेथून रवाना झाली. कर्जतमध्ये आठ उमेदवार रिंगणात असून केवळ एकमेव महिला उमेदवार अपक्ष आहे.कर्जत मतदार संघात कर्जत तालुका आणि खालापूर तालुक्यातील खोपोली नगरपालिका क्षेत्र तसेच जिल्हा परिषदेचे कुंभवली आणि खालापूर हे दोन प्रभाग १८९ - कर्जत विधानसभा मतदारसंघात आहेत. यात दहा मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. कर्जत मतदान केंद्राचे मुख्य प्रशासकीय कार्यालय कर्जत दहिवलीच्या पराडे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र बोरकर यांच्यासह सहाय्यक निर्णय अधिकारी रवींद्र बाविस्कर, दीपक आकडे आणि नव्याने निवडणूक आयोगाकडून निरीक्षक म्हणून जबाबदारी टाकण्यात आलेले घाना राम यांच्या उपस्थितीत कामकाज करण्यात आले.मतदान प्रक्रि येसाठी ज्या ईव्हीएम मशीन सील करण्यात आल्या होत्या, त्या व अन्य साहित्य आज दुपारी मतदान केंद्रप्रमुख व त्यांच्या चार सहकाऱ्यांकडे देण्यात आले. जवळपास १५५० अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदान कार्यात आहेत. त्याचवेळी १५५ अधिकारी- कर्मचारी राखीव म्हणून असतील. एकूण ३१० मतदान केंद्रांसाठी ३१० मतदान यंत्रे लागणार आहेत, त्याशिवाय मतदान यंत्रात कोणतीही अडचण आल्यास तातडीची उपाययोजना म्हणून ३९ यंत्रे तयार ठेवली आहेत. ज्या चौदा केंद्रात बाराशेहून अधिक मतदार आहेत, तेथे एक कर्मचारी अधिकचा तैनात करण्यात आला आहे. कर्जत मतदारसंघात दहा मतदान केंद्रे संवेदनशील आहेत, तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या मतदारसंघाची मतमोजणी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातच होणार आहे.