रिफायनरीसाठी सरकार सरसावले, लोकांचा विरोध मावळला; भूसंपादनासाठी स्थानिकांशी चर्चा - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 01:18 PM2022-11-23T13:18:21+5:302022-11-23T13:20:12+5:30

बारसू रिफायनरीबाबत उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली.

Government moves for refinery, public opposition subsides; Talks with locals for land acquisition says Udaya Samant | रिफायनरीसाठी सरकार सरसावले, लोकांचा विरोध मावळला; भूसंपादनासाठी स्थानिकांशी चर्चा - उदय सामंत

रिफायनरीसाठी सरकार सरसावले, लोकांचा विरोध मावळला; भूसंपादनासाठी स्थानिकांशी चर्चा - उदय सामंत

googlenewsNext

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्रकल्पाच्या दिशेने सकारात्मक पाऊल पडले असून या प्रकल्पाला होत असलेला विरोध मावळत असल्याचे चित्र आहे. रिफायनरी उभारण्यापूर्वी येथील स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या बैठकीनंतर सांगितले.   

बारसू रिफायनरीबाबत उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली.  या बैठकीला उपस्थित असलेले शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी प्रकल्पाला पाठिंबा देत सरकारच्या भूमिकेला समर्थन दिले. एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.  

बारसू रिफायनरीसाठी एकूण ६,२०० एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यापैकी २,९०० एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. उर्वरित जमीन संपादन करण्यासाठी स्थानिकांना विश्वासात घेतले जाईल. या भागातील सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी, स्थानिकांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला आहे. येथील जनतेच्या मागण्या पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करेल, या प्रकल्पामुळे येथील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. प्रकल्पाबाबत असलेले जनतेचे गैरसमज दूर केले जातील. याशिवाय जमिनीच्या दराबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

या रिफायनरीमुळे दोन लाख कोटींची थेट गुंतवणूक होणार आहे. यातून सुमारे एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे. रिफायनरीसोबत या भागात सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधणे, ओणी येथे उपलब्ध असणारे रुग्णालय तत्काळ सुरू करणे, मुंबई- गोवा महामार्गालगत एक लाख वृक्ष लागवड करण्याचे निर्णयही बैठकीत घेण्यात आले. 

या प्रकल्पासाठी शिवणे, देवाचे गोटने या गावांचे भूसंपादन होणार नाही. तर सोलगाव हे गाव कायमचे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच भागात आदर्शवत असे कौशल्य विकास केंद्रही सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.   

 रिफायनरीसाठी कोयना धरणातील पाणी  
रिफायनरीसाठी लागणारे १६० एमएलडी पाणी कोयना धरणातून आणण्यास या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. कोयना धरणातून बारसू प्रकल्पापर्यंत पाइपलाइन टाकली जाणार आहे. ही पाइपलाइन ज्या गावांमधून जाईल त्या गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. या पाण्याचा वापर जिल्ह्यातील इतर भागालाही होईल. त्याचबरोबर अर्जुना व खोदवली नदी पात्रातील गाळही काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विनायक राऊत यांचे पत्र
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरीला पाठिंबा दिला असताना रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी मात्र लोकांचा विरोध असेल तर आपलाही या प्रकल्पाला विरोध असेल, असे पत्र सरकारला दिले. त्यामुळे ठाकरे गटातील आमदार आणि खासदार यांच्यात या प्रकल्पावरून मतभेद समोर आले आहेत.

Web Title: Government moves for refinery, public opposition subsides; Talks with locals for land acquisition says Udaya Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.