'महाराष्ट्रात गल्ली गुंडांचं सरकार'; आदित्य ठाकरेंचा शिंदेंसह गृहमंत्र्यांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 07:06 PM2023-04-04T19:06:35+5:302023-04-04T19:07:47+5:30
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी आणि पुत्र आदित्य यांच्यासह रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
मुंबई - ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणप्रकरणी आता उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांची तक्रार अद्याप नोंदवून घेण्यात आलेली नसल्यानं ठाकरे गटाकडून उद्या ठाणे पोलीस आयुक्तालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा महामोर्चा आयोजित करण्यात आला असून आमदार आदित्य ठाकरे याचं नेतृत्व करणार आहेत. तत्पूर्वी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर, पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला. तर, आदित्य ठाकरेंनीही ट्विट करुन शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी आणि पुत्र आदित्य यांच्यासह रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरे ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात पोहोचले. पण ठाणे पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्तच उपस्थित नसल्यानं उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. यामुळे ठाकरे गट चांगलाच संतापला आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीसांवर जबरी प्रहार केला. तर, आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करुन शिंदे गटाला मिंधे-चिंधे म्हणत हल्लाबोल केलाय.
महाराष्ट्रात गल्ली गुंडांचं सरकार असल्याचा पक्का विश्वास सामान्य जनतेला होत आहे. गद्दार गँगने केलेली भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण असो किंवा गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत केलेला गोळीबार असो... एकंदरीत राज्याच्या गृहमंत्र्यांना कारभार जमतोय का, हा प्रश्न उपस्थित होतो. pic.twitter.com/qNNG5LA1Ef
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 4, 2023
युवतीसेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे यांच्यासमवेत आज ठाणे येथील रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचं आदित्य यांनी सांगितलंय. तसेच, महाराष्ट्रात गल्ली गुंडांचं सरकार असल्याचा पक्का विश्वास सामान्य जनतेला होत आहे. गद्दार गँगने केलेली भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण असो किंवा गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत केलेला गोळीबार असो. एकंदरीत राज्याच्या गृहमंत्र्यांना कारभार जमतोय का, हा प्रश्न उपस्थित होतो, असे आदित्य यांनी म्हटलंय.
महिला आघाडीचा महामोर्चा
रोशनी शिंदे मारहाणप्रकरणी अजूनही एफआयआर नोंदवून घेण्यात आलेली नसल्यानं ठाकरे गट संतापला असून उद्या महिला आघाडीच्या माध्यमातून महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. उद्या दुपारी तीन वाजता ठाण्यातील शिवाजी मैदानातून या मोर्चाला सुरुवात होणार असून ठाणे पोलीस आयुक्तालावर धडणार आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.