मुंबई : मुंबई आणि उपनगराला पावसाने अक्षरश: झोडपले आहे. ठिकठिकाणी पाणी गुडघाभर पाणी साचले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, याबाबत मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिली आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा सुरुच राहणार आहेत
दरम्यान, पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईतील विविध ठिकाणांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांच्या समवेत अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरसू, महापालिका आयुक्तांचे उपायुक्त चंद्रशेखर चोरे, पायाभूत सुविधा विभागांचे संचालक संजय दराडे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
आयुक्त इक्बालसिंह चहल वांद्रे पूर्व परिसरातील ओएनजीसी पातमुखाजवळील (ONGC outfall) भागाची पाहणी केली. तसेच, अंधेरी सबवेची पाहणी केली. याशिवाय, मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विविध ठिकाणी पाहणी केली. तसेच, नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.
आज आणि उद्या मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा तर दक्षिण कोकणात पुढील 48 तासात जोरदार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
लोकल, रस्ते वाहतुकीवर परिणामअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु असलेल्या लोकल वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प झाली आहे. सायन रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी साचलं आहे. तर सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पाणी साचल्याने हिंदमाता फ्लायओव्हर, अंधेरी सबवे, मालाड सबवे, मिलन सबवे, किंग सर्कल, शिंदेवाडी, दादर टीटी हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
आणखी बातम्या...
मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर, सखल भागात पाणी साचले, रेल्वेही ठप्प!
मुंबईत पावसाचे धूमशान, पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, वाहतूक कोलमडली
जोरदार पावसाने डोंबिवली शहराला झोडपले, चाकरमान्यांचे नियोजन कोलमडले
सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा