‘त्या’ अंत्यसंस्कारांना सरकारी अधिकारी उपस्थित राहणार;CM शिंदेंचे आरोग्य विभागाला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 06:50 AM2024-01-24T06:50:32+5:302024-01-24T07:15:38+5:30
अवयवदानासाठी ‘लोकमत’ सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून जनजागृती करत आहे.
- संतोष आंधळे
मुंबई : ‘शाब्बास महाराष्ट्र, जाता जाता १४९ जणांनी दिली जगण्याची आशा’, ही बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच त्याची दखल थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. यापुढे मेंदुमृत अवयदात्याच्या अंत्यसंस्काराला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबीयांची भेट घ्यावी, असा आदेशही त्यांनी तत्काळ काढला.
अवयवदानासाठी ‘लोकमत’ सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. अवयवदान केल्यामुळे कोणाचे कसे जीव वाचले याच्याही बातम्या ‘लोकमत’ देत आला आहे. त्या मोहिमेला मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशामुळे बळ मिळाले आहे. अनेकवेळा अवयवदात्याकडून अवयव प्राप्त झाल्यानंतर त्या कुटुंबाचे काय झाले, याबद्दल कुणी साधी विचारपूसही करत नाही. एक अवयवदाता दोन ते तीन रुग्णांना जीवनदान देत असतो.
दशकभरात प्रथमच अवयवदानाने हजारांचा आकडा पार केला. या मोहिमेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पाच राज्यांत महाराष्ट्र चाैथा आहे. या चळवळीतल्या अवयवदात्यांचे कुटुंब, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालये, समुपदेशक, पोलिस या यंत्रणांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.
राज्यात आकडेवारी वाढली असली तरी अवयवांची गरज असणाऱ्यांची प्रतीक्षा यादी मोठी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे. त्या प्रमाणात अवयवदान होत नाही. त्यासाठी जागृतीची गरज आहे. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. त्यामुळे अवयवदान वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यासंदर्भात काढलेल्या पत्रात म्हटले आहे.