उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांचे फोन टॅपिंग प्रकरणी सरकारकडून चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 10:54 AM2020-01-24T10:54:59+5:302020-01-24T11:00:39+5:30
विधानसभा निवडणुकीच्या काळात फडणवीस सरकारने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचे फोन टॅप केल्याची माहिती समोर आली होती.
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे फोन टॅपिंग केले असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यास महत्वाची भूमिका संजय राऊत यांनी निभावली होती. संजय राऊत यांना देखील आपला फोन टॅप करत असल्याची माहिती मिळताच ट्विट करुन माझा फोन टॅप केला जात असल्याची माहिती मला भाजपाच्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी दिली असल्याचे सांगितले आहे. तसेच माझे बोलणे जर कोणाला ऐकायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य असल्याने मी कोणतेही काम लपून करत नसल्याचे संजय राऊत यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.
सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे फोन व विशेषत: व्हॉट्सअॅप मेसेज टॅप केल्याचा आरोप केला गेला होता. त्याविषयी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही प्रसारमाध्यमांसमोर काही आरोप केले होते. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन टॅपिंग प्रकरणी सायबर सेलला चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगितले आहे.