दुष्काळ निवारणासाठीचे सरकारी नियोजन ढेपाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 05:43 AM2019-05-09T05:43:07+5:302019-05-09T05:43:27+5:30
राज्यातील दुष्काळाची दाहकता प्रचंड वाढली असताना भाजप-शिवसेना सरकारचे नियोजन मात्र कुठेच दिसत नाही.
मुंबई : राज्यातील दुष्काळाची दाहकता प्रचंड वाढली असताना भाजप-शिवसेना सरकारचे नियोजन मात्र कुठेच दिसत नाही. चारा व पाण्याची टंचाई जनतेच्या जीवावर उठली असून दुष्काळी भागातून स्थलांतर वाढले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. ते म्हणाले, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर जत भागात तर जुन्नरमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नुकतेच भेट देण्यास गेले असता या दोन्ही मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठ्या आक्रोशाला सामोरे जावे लागले, यातूनच जनता किती त्रस्त आहे हे दिसून येते.
दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असून केंद्र सरकारकडून राज्याला निधी मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मग हा निधी दुष्काळी जनतेला पावसाळा सुरु झाल्यानंतर देणार आहात का? मदत मिळवण्यात एवढी दिरंगाई का झाली, असा सवाल त्यांनी केला.
स्थलांतरितांना मदत करा
दुष्काळग्रस्त मराठवाड्यासह, सोलापूर व इतर भागातून स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या भागातले लोक पुणे, मुंबईसारख्या शहरात नातेवाईकांकडे आसरा घेऊ लागले आहेत. तर काही लोकांना मुंबईच्या फुटपाथ, उड्डाणपुलाच्या खाली मोकळ्या जागेचा आधार घ्यावा लागत आहे, राज्य सरकारने त्यांना योग्य ती मदत देण्याची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले.