Join us

'काश्मीरमधील 'ही' पर्यटनस्थळं अदानी-अंबानींना विकण्याचा सरकारचा डाव'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 4:07 PM

मोदी सरकारने 370 कलमाबाबत लोकांना विश्वासात घेऊन निर्णय होणे आवश्यक होते.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. विधानसभा निवडुकीच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील मुलभूत प्रश्नांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांनी पत्रकारांना संबोधित केले. त्यावेळी, कलम 370 हटविल्यानंतर, आता केंद्र सरकार अदानी आणि अंबानी यांना पर्यटनस्थळ विकणार असल्याचा आरोप मलिक यांनी केला. 

मोदी सरकारने 370 कलमाबाबत लोकांना विश्वासात घेऊन निर्णय होणे आवश्यक होते. 370 कलम रद्द करण्यामागे काश्मीरमधील गुलमर्ग, सोनमर्गसारखी पर्यटनस्थळे अदानी-अंबानी यांना देण्याचे कटकारस्थान सरकार करत असल्याची टीका मलिक यांनी केली. मूळ प्रश्नांना बगल देत भाजप सरकार काश्मीरच्या झेंड्यावर राजकारण करतंय. काश्मीरच्या झेंड्याला विरोध करणारे हे सरकार नागालँडमध्ये वेगळ्या झेंड्यास विरोध का करत नाही, असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला. 

देशात सध्या काश्मीरच्या मुद्द्यावरून राजकारण केले जातेय. मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदा तिरंगा फडकला असे वक्तव्य केंद्रिय गृहमंत्री अमित शहा करतात. मात्र, काश्मीरमध्ये पहिल्यापासून भारताचा झेंडा फडकत असून अमित शहा देशाला चुकीची माहिती देत असल्याचा आरोप नवाब मलिक केला. आतापर्यंत आरएसएसच्या मुख्य कार्यालयावर भारताचा तिरंगा फडकला नव्हता तो आमच्या आंदोलनाने फडकला, अशी टिप्पणीदेखील त्यांनी केली. दरम्यान, केंद्र आणि राज्यात एक तरी प्रकल्प दाखवा जो भाजपा सरकारने पूर्ण केला आहे. सध्या जी मेट्रोची कामे सुरू आहेत, तीदेखील आघाडी सरकारच्या काळातील आहेत. त्यामुळे फडणवीस सरकार फक्त श्रेय घेण्यासाठी काम करत असल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसनरेंद्र मोदीअमित शहाजम्मू-काश्मीरराजकारणपर्यटन